कोल्हापूर : कर्करोगाचा प्रतिबंध करण्यासाठी तंबाखूला नाही म्हणायला हवे आणि महिलांनी सातत्याने स्तनाची तपासणी करून घ्यावी, असे आवाहन कोल्हापूर कॅन्सर सेंटरचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. सूरज पवार यांनी केलेे.
जागतिक कर्करोग दिनाच्यानिमित्ताने गुरुवारी जिल्हा परिषदेत कोल्हापूर कॅन्सर सेंटरच्या सहकार्याने मोफत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी डॉ. पवार बोलत होते. यावेळी ३६ जणांची तोंडामध्ये लालसर चटटा, अल्सर , मौखिक आरोग्य, स्तन, गर्भाशय तपासणी करण्यात आली. ४५ वर्षांवरील स्त्रियांची मॅमोग्राफी करण्यात आली.
मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण म्हणाले, कोल्हापूरात तंबाखूच्या व्यसनाचा मोठा धोका आहे. त्यामुळे या व्यवसनापासून दूर राहण्यासाठी जनजागरणाची गरज आहे. भ्रामक सौंदर्यकल्पनांमुळे महिला स्तनपान करीत नाहीत किंवा लवकर बंद करतात. याचेही दुष्परिणाम दिसून येत आहेत. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योेगेश साळे म्हणाले, जंकफूड टाळणे आणि समतोल आहार घेण्याची गरज आहे. सूत्रसंचालन प्रभारी सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उत्तम मदने यांनी केले. यावेळी जिल्हा परिषदेकडील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. यावेळी डॉ. हर्षला वेदक, डॉ अर्जुन शिंदे, डॉ. श्रीकार उमराने उपस्थित होते.
०४०२२०२१ कोल झेड पी ०१
जागतिक कर्करोग दिनी गुरुवारी कोल्हापूर कॅन्सर सेंटरच्या सहकार्याने कोल्हापूर जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी संजयसिंह चव्हाण यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. डॉ. योगेश साळे, डॉ. हर्षला वेदक, डॉ. उत्तम मदने, डॉ. सूरज पवार यावेळी उपस्थित होते.