कोल्हापूर : दिवसेंदिवस महागाई आकाशाला भीड आहे. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांना जीवन जगणे मुश्किल झाले आहे. जीवनावश्यक वस्तूसोबत औषधउपचार सर्वसामान्याच्या आवाक्याबाहेर गेला आहे. अशा परिस्थितीत फक्त दहा रुपयांत औषधोपचार करून गुजरी येथील भगवान महावीर सेवाधाम ट्रस्टच्या सेवार्थ रुग्णालय रुग्णांना दिलासा देत आहेत. याठिकाणी ताप, सर्दी, पडसेच नव्हे, तर दात, कान, नाक, घसा, नेत्र आणि अस्थीसंबंधी आजारांवर अत्यल्प दरात विशेषतज्ज्ञ रुग्णांवर उपचार करण्यात येतात. यामध्ये आता शरीरातील विविध अवयव व रक्तघटकांच्या विविध चाचण्यांसाठी अत्याधुनिक लॅबची सेवाही अत्यल्प दरात गरजू रुग्णांना दिली जाते. अपघातांमुळे व गंभीर आजारी असणाऱ्या रुग्णांना महिना किंवा दोन महिन्यांसाठी शरीराच्या हालचाली व्यवस्थित व्हाव्यात म्हणून विविध कृत्रिम साहित्याची गरज असते. असे एक ते पंधरा हजार रुपयांपर्यंतचे हे साहित्य विकत घेणे सर्वांना परवडणारे नसते. अशावेळी गरजू रुग्णांना फोल्ंिडग एअर बेड, वॉकर, व्हीलचेअर, कमोड चेअर, कुबडी, बेड पॅन, युरिन पॉट, आदी वस्तू ठरावीक मुदतीसाठी उपलब्ध करून देणारी ही संस्था सर्वत्र परिचित झाली. या संस्थेची सुरुवात सहा वर्षांपूर्वी झाली. संस्थेच्यावतीने आतापर्यंत लाखो गरजू रुग्णांवर अत्यल्प व काही रुग्णांवर मोफत उपचार करण्यात आले आहेत. गेल्या वर्षात १२५ मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. यात प्रत्येक महिन्यात एक दानशूर व्यक्ती किमान दहा रुग्णांची जबाबदारी घेऊन त्यांच्या मोतीबिंदू शस्त्रक्रियेचा खर्च उचलते. संस्थेच्या या रुग्णालयाने सहाव्या वर्षीही केसपेपर, औषधे आणि इंजेक्शन असा औषधोपचारांचा खर्च दहा रुपयेच ठेवलेला आहे. आज, शनिवारी होणाऱ्या वर्धापनदिन कार्यक्रमात गरजू अपंग व्यक्तीला जयपूर फूट वाटप, शालेय मुलींची हिमोग्लोबीन तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन केले आहे. सध्या अध्यक्ष विनोद ओसवाल हे काम पाहत आहेत. (प्रतिनिधी)संस्थेने अल्पदरात व मोफत सुरू केलेले उपक्रम सेवार्थ रुग्णालय, सेवार्थ लॅबोरेटरी, राष्ट्रीय क्षयरोग निदान शिबिर, मोफत मोतीबिंदू शिबिर, विनामोबदला रुग्णोपयोगी साहित्य सेवा केंद्र, रक्तगट सूची, अंध विद्यार्थी शैक्षणिक प्रकल्प, कर्णबधिर विद्यार्थी श्रवणयंत्र सुविधा, सीपीआर रुग्णालयामध्ये लॉकर सुविधा.
महागाईतही अवघ्या दहा रुपयांत उपचार
By admin | Published: February 27, 2015 11:09 PM