कोल्हापूर दि. 31 : कोल्हापुरात मिळालेल्या संधीमुळे पत्रकारितेत यशस्वी कारकिर्द करुन शासकीय सेवेत प्रवेश करता आला. कोल्हापुरात प्रारंभ झालेली पत्रकारिता, कोल्हापुरातच शासकीय सेवेतून निवृत्ती हा योगायोग असल्याच्या भावना कोल्हापूर विभागाचे माहिती उपसंचालक सतीश लळीत यांनी व्यक्त केल्या.
लळीत हे सेवानिवृत्त झाल्याने त्यांना विभागीय व जिल्हा माहिती कार्यालय, कोल्हापूर यांच्यावतीने आयोजित कार्यक्रमात निरोप देण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. लळीत यांनी यावेळी आपल्या पत्रकारिता आणि शासकीय सेवेतील अनुभव व आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, पत्रकारितेची सुरुवात कोल्हापुरात झाली. त्यानंतर माहिती व जनसंपर्क विभागाच्या सिंधुदुर्ग, गोव्याचा महाराष्ट्र परिचय केंद्राचा प्रमुख, कोल्हापूर, ‘लोकराज्या’ संपादक, मुख्यमंत्र्यांचे मुख्य जनसंपर्क अधिकारी, नाशिक आणि कोल्हापूर विभाग उपसंचालक अशा विविध ठिकाणी काम करण्याची संधी मिळाली. कोल्हापूरशी असलेला आपला निकटचा संबंध, आपुलकी, प्रेम हे सदैव अविस्मरणीय राहील.
प्रास्ताविकात एस.आर.माने म्हणाले, श्री. लळीत यांच्या सोबत काम करताना त्यांचा निडरपणा, कामातील त्यांची गती व प्रशासकीय कामाकाजातील ज्ञान व अनुभव यामुळे बरेच काही शिकता आले.याप्रसंगी आलोक जत्राटकर, रामदास परब, रणजित पवार, सतीश शेंडगे, डॉ.बाळकृष्ण लळीत, डॉ. संदीप नाटेकर, डॉ. सौ. सई लळीत, सुर्यकांत टोणपे यांनी आपली मनोगते व्यक्त केली. रणजीत पवार यांनी आभार मानले.