पेठवडगाव : वडगावातील सांडपाण्यावर प्रक्रिया न करता थेट मसोबावाडी येथील बंधाऱ्यामध्ये व त्यानंतर वारणा नदीत जात आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे तरी पालिकेने सांडपाण्यावर प्रक्रिया करून पाणी सोडावे, अशी मागणी मसोबावाडी येथील ग्रामस्थांनी निवेदनातून नगराध्यक्ष मोहनलाल माळी यांच्याकडे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, वडगाव शहरातील सांडपाणी मसोबावाडी येथील ओढ्यातून जाते. या ओढ्याजवळ जनावरे कत्तलखाने आहेत. त्यामुळे रक्तयुक्त पाणीसुद्धा ओढ्यात सोडले जाते. या ओढ्यावर बंधारा घालण्यात आला आहे. त्यातील काहीजण शेतीसाठी हे पाणी वापरतात तसेच हे पाणी बंधाऱ्यांमध्ये साठून राहिल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरते तसेच डास वाढतात. त्यामुळे या परिसरातील ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. हेच सांडपाणी वारणा नदीत मिसळते. याठिकाणी वडगाव, भादोले गावातील पिण्याच्या पाण्याचे जॅकवेल आहेत. पर्यायाने दोन्ही गावांत दुर्दैवाने अशुद्ध पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे वडगाव पालिकेने तातडीने कार्यवाही करावी. अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.
यावेळी विश्वास खोत, संदीप मगदूम, अमर पाटील, प्रणव खोत, सुमित कदम, दत्तात्रय खोत, बाजीराव खोत आदी उपस्थित होते.
फोटो - २९१२२०२०-जेएवाय-०६
फोटो ओळ - पेठवडगाव येथे विनाप्रक्रिया सांडपाणी थेट ओढ्यात सोडले जात आहे.