विश्वास पाटीलकोल्हापूर : आपले गाव सोडून शहरात जाऊन हमाली करण्याचे मॉडेल मोडले पाहिजे, यासाठीच यापुढील आयुष्य खर्ची घालणार असल्याचे पर्यायी विकास नीतीसाठी आग्रह धरणारे नेते डॉ. भारत पाटणकर यांनी सांगितले. डॉ. पाटणकर यांचा आज बुधवारी कोल्हापुरातील शाहू स्मारक भवनात ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते अमृतमहोत्सवी नागरी सत्कार होत आहे. त्यानिमित्त त्यांनी आपल्या संघर्षपूर्ण आयुष्याचे पदर उलगडून सांगितले.दलित आदिवासी, श्रमिक, कष्टकरी, बहुजन स्त्री-पुरुषांच्या मुक्तीदायी चळवळीतील बिनीचे कार्यकर्ते, शास्त्रीय समाजवादाची नवी मांडणी करणारे विचारवंत, समन्यायी पाणी वाटप, धरणग्रस्त-दुष्काळग्रस्तांची लढा चालवणारे नेते, लेखक, कवी, कलावंत, विचारवंत, कार्यकर्ता नेता, असे बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेले डॉ. पाटणकर यांचे जगणे समजून घेण्याचा प्रयत्न ‘लोकमत’ने केला. त्यांच्याशी झालेला संवाद असा :
प्रश्न : तुमची जडण-घडण कशी झाली?उत्तर : माझे आजोबा दिनकरराव निकम (आईचे वडील) हे सातारा जिल्ह्यातील इंदोलीचे. ते स्वातंत्र्य चळवळीत यशवंतराव चव्हाण यांच्या बरोबरीने सक्रीय होते. आमच्या घरी स्वातंत्र्यसैनिकांचा वावर होता. आई इंदूबाई, वडील क्रांतीवीर बापूजी पाटणकर यांच्यावरही त्या काळात स्वातंत्र्य चळवळीचे संस्कार झाले. तोच स्वातंत्र्य चळवळीचा, सत्यशोधक विचारांचा वारसा आणि प्रभाव माझ्यावर पडला. जडण-घडण होण्याच्या वयातच जीवनाचे ध्येय निश्चित झाले. जुन्या सातारा जिल्ह्यात १९५२ मध्ये पाच स्वातंत्र्यसेनानींचे खून सरकारनेच घडवून आणले. त्यात वडिलांचाही खून झाला, तेव्हा मी दीड वर्षाचा होतो, परंतु आई हिंमती आणि करारी होती. आमचे कासेगाव (जि. सांगली) येथील घर म्हणजे, तर स्वातंत्र्यसैनिकांचे. सत्यशोधक चळवळीचे केंद्रच होते. १९४२ च्या प्रतिसरकारच्या कार्यकारिणीचे वडील प्रमुख नेते होते. या सगळ्या वातावरणामुळे जीवन बदलून गेले.प्रश्न : व्यक्तिगत आयुष्यात स्वत:च्या करिअरकडे कसे लक्ष दिले ?उत्तर : माझे शिक्षण कासेगावनंतर मिरज मेडिकल कॉलेजमध्ये झाले. त्यावेळी डॉ. नरेंद्र दाभोलकर माझ्यासोबत होते. १९७२ चा तो काळ. एमबीबीएस झालो. एमडीसाठी मुंबईच्या ग्रॅंट मेडिकलला गेलो. तो काळच असा होता की, देशाच्या वैद्यकीय कॉलेजमधून, आयआयटीमधून जे विद्यार्थी बाहेर पडत होते, त्यांना त्याकाळी समाजात काय चाललंय ते पसंत नव्हते. आम्ही त्यावेळी मागोवा ग्रुप तयार केला. त्यातून नंदुरबार जिल्ह्यात आदिवासींसाठी, मुंबईला कामगार चळवळ, सांगली जिल्ह्यात शेतमजूर चळवळ, अशा चळवळी करत राहिलो. त्यावेळच्या पिढीनेच समाजासाठी काम करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानुसार व्यक्तिगत आयुष्यातील करिअरची वाट सोडून समाजाच्या भल्यासाठी आम्ही काम सुरू केले.प्रश्न : डॉ. गेल ऑम्वेट यांची भेट कशी झाली ?उत्तर : डॉ. गेल ऑम्वेट या अमेरिकेहून १९७२-७३ च्या सुमारास पश्चिम भारतातील सांस्कृतिक बंड, महाराष्ट्रातील ब्राम्हणेतर चळवळ या विषयांवर संशोधनात्मक अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्रात आल्या होत्या. या चळवळीत आमचेही कुटुंब असल्याने त्या आमच्या सान्निध्यात आल्या. त्यातून १९७६ मध्ये आमचे लग्न झाले. त्यांनी व्यक्तिगत आणि नंतर आम्ही दोघांनी संयुक्तपणे अनेक ग्रंथ लिहिले. स्त्री मुक्ती चळवळीत त्यांचा मोठा पुढाकार राहिला. एक सहचारिणी म्हणून माझ्या जीवनावर त्यांचाही मोठा प्रभाव राहिला आणि वाटचालही आधार देणारी राहिली.प्रश्र्न : कोणती चळवळ तुमच्या दृष्टीने जास्त महत्त्वाची वाटते ?उत्तर : सगळ्याच चळवळी महत्त्वाच्या आहेत, परंतु समन्यायी पाणी वाटपाच्या चळवळीने जगभरात न झालेले काम केले आहे. या चळवळीत नागनाथअण्णा नायकवडी आणि मी एकत्र होतो. आटपाडी तालुक्यातील पाणी वाटपाचे विषम पद्धती बंद करून प्रत्येक कुटुंबाला साडेतीन एकर ऊस आणि पाच एकर डाळिंब्याच्या बागेला पाणी देता येणे हे शक्य आहे, हे सिद्ध करून दाखविले. बंद पाइपसह पाणीपुरवठा आराखडा अंमलात आणला. सांगोला, तासगाव तालुक्याचाही आराखडा तयार आहे. आटपाडीचा समन्यायी पॅटर्न महाराष्ट्राला लागू करण्यासाठी आम्ही आग्रही आहे.प्रश्न : सहा महिने काम केल्यावर लोकं सत्तेच्या आधाराला जातात, हयात गेली तरी आपणास ती ओढ का लागली नाही ?उत्तर : चळवळीच्या माध्यमातून झालेली जडण-घडण हेच त्याचे प्रमुख कारण आहे. बाबूराव जगताप, शांताराम गरुड, शेख काका, माधवराव गायकवाड, गुलाबराव गणाचार्य यांच्यासारखी पिढी आमच्यासमोर होती आणि नियमित सुखासीन आयुष्य सोडून समाजासाठी संघर्ष करणारी पिढी त्यावेळी जगभर आकारास आल्याचे चित्र आपल्याला दिसते.प्रश्न : कोणत्या प्रश्नांकडे अजून अधिक लक्ष द्यावे असे वाटते ?उत्तर : पर्यायी विकासनीतीची अंमलबजावणी व्हावी, यासाठीचे प्रयत्न ताकदीने करणार आहे. गाव सोडायचे आणि शहरात येऊन हमाली करायची, हे मॉडेल मोडले पाहिजे. त्यासाठी गावे समृद्ध झाली पाहिजेत. पूर्वीची रसायनेमुक्त शेती, गावपण जपणारा समाज, पुनर्निर्मितीक्षम उद्योगाला बळ देऊन गावातच रोजगाराच्या संधी याचा विचार आता गंभीरपणे करण्याची गरज आहे. प्रदूषण करणारा, जंगले खाऊन टाकणारा आणि समाजाला रोगी बनवणारा विकास आम्हाला नको आहे. गावांमध्ये पैसा आला, परंतु बैचेनी वाढली. आजार वाढले, हा विकास आपल्याला नको आहे.
संघर्षमय जीवनाची ५८ वर्षेडॉ. पाटणकर यांची चळवळीतील ओळख डॉक्टर अशी आहे. त्यामुळेच कष्टकऱ्यांच्या जीवनात डॉक्टर या शब्दाला कमालीचे महत्त्व आहे. डॉक्टर आपल्यासाठी लढत आहेत, संघर्ष करत आहेत, ते आहेत म्हटल्यावर आपल्या जीवनात चार सुखाचे दिवस येतील, असा विश्वास राज्यभरातील कष्टकऱ्यांच्या अनेक चळवळींना वाटतो. यश-अपयशाची तमा न बाळगता डॉक्टर गेली ५८ वर्षे या लोकांच्या प्रश्नांसाठी संघर्ष करत आहेत. विविध लढ्यांनीच त्यांचे आयुष्य व्यापून गेले आहे. दुसऱ्याच्या भल्यासाठी स्वत:चे सारे आयुष्य पणाला लावणारी अशी माणसेही या पृथ्वीतलावर होती, हे पुढच्या पिढ्यांना कदाचित खरे वाटणार नाही, इतके मोठे काम त्यांचे आहे.