कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीसाठी सोमवारी, २१ डिसेंबर रोजी आरक्षण सोडत जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे अनेक प्रभागाती लढती ठरणार आहेत. महापालिकेचे उपायुक्त निखिल मोरे यांनी ही माहिती दिली.कोल्हापूर महानगरपालिकेच्या सभागृहाची मुदत १५ नोव्हेंबर रोजी संपली आहे. कोरोनामुळे महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणुक पुढे ढकलण्यात आल्याने १६ नोव्हेंबरपासून आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांच्याकडे प्रशासक म्हणून महापालिकेचा कारभार आहे.महानगरपालिकेच्या संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात २१ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता महापौरपदासाठी आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. याच दिवशी प्रारुप प्रभाग रचनेचा आराखडाही प्रसिध्द केला जाणार आहे.दरम्यान, गेल्याच आठवड्यात महानगरपालिकेच्या निवडणुकीची पूर्वतयारी निवडणूक आयोगाकडून सुरु करण्यात आली होती. या निवडणुकीसाठी तयार केलेल्या प्रारुप प्रभाग रचनेचा प्रस्तावही प्रशासनाने राज्य निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आला होता.
शहरातील ८१ प्रभागांचे प्रारूप प्रभाग रचना प्रस्ताव ११ डिसेंबरपर्यंत सादर करण्याची सूचना आयोगाने केली होती. त्यानुसार महापालिका उपायुक्त निखिल मोरे तसेच प्रारूप प्रभाग रचनेची माहिती असलेले सचिन देवाडकर यांनी मुंबईत आयोगाच्या कार्यालयात सादर केली. नंतर आयोगाच्या सूचनेनुसार सात ते साडेसात हजार लोकसंख्या असलेला एक प्रभाग असावा असे निर्देश असल्याने शहरातील पाच प्रभागातील प्रगणक गट बदलले असले तरी त्याचा परिणाम अन्य पाच प्रभागांवर झालेला आहे.महापालिकेने तयार केलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर आयोगाकडून हरकती व सूचना मागविल्या जाणार आहेत. त्यावर सुनावणी होऊन अंतिम प्रभाग रचना तयार केली जाणार आहे. २३ डिसेंबर ते ४ जानेवारी पर्यंत त्यावर हरकती व सूचनांसाठी वेळ देण्यात आला आहे.