कोल्हापूर : राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त कोल्हापूर प्रेस क्लब व श्री भास्करराचार्य प्रतिष्ठान यांच्यातर्फे शुक्रवार, दि. २५ जूनपासून वर्षभर ऑनलाईन व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. तिचे पहिले पुष्प शुक्रवारी सायंकाळी ६ ते ७ यावेळेत ‘मी असा घडलो’ या विषयावर ‘नाबार्ड’चे माजी अध्यक्ष यशवंत थोरात हे गुंफणार आहेत.
सुमारे वर्षभर चालणाऱ्या या व्याखानमालेचे पहिले पुष्प थोरात यांनी गुंफल्यानंतर प्रा. मधुकर पाटील हे ‘राजर्षी शाहू महाराजांचे कार्य आणि विचार’ या विषयावर विचार मांडणार आहेत. यानंतर पुढील काळात माजी परराष्ट्र सचिव व मानवाधिकार आयोगाचे सदस्य ज्ञानेश्वर मुळे, ज्येष्ठ कृषितज्ज्ञ बुधाजीराव मुळीक, पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरु डाॅ. अरुण अडसूळ, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष फ. मु. शिंदे, चाटे शिक्षण समूहाचे अध्यक्ष प्रा. गोपीचंद चाटे, नांदेडचे प्रा. डाॅ. अजय गव्हाणे, प्रा. डाॅ. गजेंद्र गणोरकर, स्वरदा फडणीस, प्रा. प्रज्ञा गिरी यांच्यासह मान्यवर विविध विषयांवर विचार मांडणार आहेत. हे व्याख्यान चाटे ग्रुप ऑफ एज्युकेशन व भारत खराटे यू ट्यूब चॅनेलच्या माध्यमातून सर्वांना पाहता येणार आहे. शाहूंचा विचार नव्या पिढीपर्यंत जावा, असा विचार करून हा उपक्रम सुरु करण्यात आला असल्याचे खराटे यांनी सांगितले.
फोटो : २३०६२०२१-कोल-यशवंत थोरात