कोल्हापूर : टिंबर मार्केट येथील जागेचा वापर लाकूड व्यवसाय व्यतरिक्त अन्य कोणत्याही व्यवसायासाठी करावयाचा नाही, असे असताना महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी येथे इतर व्यवसाय करण्यास परवानगी देण्याचा सदस्य ठराव मंजूर करून घेतला आहे. मोक्याची जागा घशात घालण्याचा हा त्यांचा डाव असल्याचा आरोप ताराराणी आघाडीचे नेते नगरसेवक सुनील कदम, शिवसेना शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांनी पत्रकार परिषदेत केला.
इंगवले म्हणाले, ‘ए’ वॉर्ड ७0५ ‘अ’ पैकी लेआऊट नंबर ४६ ही जागा १३ हजार ८00 चौरस फूट इतकी असून, छत्रपती राजाराम टिंबर मार्केटसाठी आरक्षित आहे. १७ जुलै १९७८ मध्ये तत्कालीन सहायक आयुक्त रंगराव पाटील व गोपाल पटेल यांच्यासह ३0 व्यक्तींशी करारपत्र झाले आहे. नाममात्र ३. ५0 दराने ९९ वर्षांच्या कराराने ही जागा त्यांना देण्यात आली आहे. करारामध्ये ही जागा लाकडू व्यवसायाशिवाय अन्य कोणताही व्यवसाय न करण्याच्या अटीवर दिली. असे असताना महापालिकेतील काही पदाधिका-यांनी येथे अन्य व्यवसायांसाठी परवानगी मिळण्यासाठीचा ठराव केला. मूळ व्यवसायाचे अस्तित्व नष्ट करून ही जागा कमर्शियल वापरात आणून, यापासून मोठा आर्थिक लाभ मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. यामुळे मूळ कराराचा भंग होणार आहे. असे बेकायदेशीर कृत्य केल्यास संबंधितांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल. वेळप्रसंगी जनआंदोलन उभे करू. यावेळी शिवसेना उपशहरप्रमुख सागर साळोखे, सचिन चौगुले, बंडा लोंडे, तात्या साळोखे, अमर जरग उपस्थित होते.ठराव रद्दसाठी आयुक्तांना भेटणार : सुनील कदमटिंबर मार्केट येथील जागा महापालिकेच्या मालकीची आहे. ठरावामध्ये इतर व्यवसाय म्हणजे नेमके काय, याची स्पष्टोक्ती केलेली नाही. हा सदस्य ठराव रद्द करावा. तसेच यासंदर्भात आॅफिस प्रस्ताव आणू नये, अशी मागणी आयुक्तांकडे करणार आहे.आयुक्तांवर नेत्यांचा दबाव आहे का?या ठिकाणी हॉटेल व्यवसायाच्या अडून अवैध व्यवसाय सुरू करण्याचा काहींचा डाव आहे. शिवाजी पेठेत हा प्रकार खपवून घेणार नाही. प्रसंगी पक्ष बाजूला ठेवून परिसरातील नागरिकांसमवेत संघटित लढा उभारू, असा इशाराही इंगवले यांनी दिला आहे. येथे पंचतारांकित हॉटेलसाठी जागा घेण्यात येत असल्याचीही चर्चा आहे. त्यामुळेच हा ठराव करण्यासाठी आयुक्तांवर नेत्यांचा दबाव आहे का, असा सवालही इंगवले यांनी केला.