राजाराम लोंढे
कोल्हापूर : कायदेशीर सावकारी करण्यासाठी सहकार विभागाच्या वतीने परवाना दिला जातो. पाचशे रुपये भरून कोणालाही हा परवाना मिळत असल्याने कोल्हापूर शहरासह ग्रामीण भागात गल्लीबोळात सावकारी करणारे पहावयास मिळत आहेत. मात्र, विनापरवाना सावकारी करणाऱ्यांची संख्या त्यापेक्षाही अधिक आहे. सहकार विभागाकडे तक्रारी आल्यानंतर त्यांच्यावर छापे टाकले जातात. मात्र, त्यातून फारसे हाताला लागत नाही.
जिल्ह्यात २८४ परवानाधारक सावकार
कोल्हापूर शहर व जिल्ह्यात २८४ परवानाधारक सावकार आहेत. त्यापैकी २५० जुने आहेत. हे सावकार गेली अनेक वर्षे सावकारी करत आहेत. मात्र, अलीकडे ३४ जणांनी नव्याने परवाना घेतलेला आहे.
पाचशे रुपयात परवाना : सहकार विभागाकडून सावकारीचा परवाना ३१ मार्चपर्यंत दिला जातो. या तारखेपर्यंतच उपनिंबधक, सहायक निबंधकांच्या माध्यमातून जिल्हा उपनिबंधकांकडे अर्ज करणे अपेक्षित असते. या कालावधीत अर्ज केला तर पाचशे रुपयांत परवाना दिला जातो. त्यानंतर म्हणजे ३१ में पर्यंत अर्ज केला तर ५०० रुपये विलंब शुल्कासह परवाना दिला जातो. त्यामुळे उशिरा परवाना मागणाऱ्यांना एक हजार रुपये मोजावे लागतात.
दरवर्षी नूतनीकरण बंधनकारक
एकदा परवाना काढला तर तो प्रत्येक वर्षी नूतनीकरण करणे बंधनकारक असते. नवीन परवान्यासह नूतनीकरणासाठीही पाचशे रुपये शुल्क सहकार विभागाकडे भरावे लागते. वेळेत नूतनीकरण न करणाऱ्यांचा परवाना आपोआपच रद्द होतो.
परवान्यासाठी काय लागते?
सावकारीचा परवाना मिळवण्यासाठी सहकार विभागाचे अधिकारी संबंधितांचे दप्तर तपासणी करतात. किती पैसे यामध्ये गुंतवले जाणार, त्यासंबंधीची सर्व कागदपत्रांची पाहणी केली जाते. त्याशिवाय आधारकार्ड, पॅनकार्डसह पाचशे रुपये परवान्यासाठी लागतात.
अनधिकृत सावकारी वाढली..
परवाना घेऊन सावकारी करणाऱ्यांची संख्या खूपच कमी आहे. त्यापेक्षा अनधिकृत सावकारी गल्लीबोळात पहावयास मिळते. ग्रामीण भागात तर त्याचे पेव फुटले आहे.
४४ छापे... १७ जणांविरुद्ध गुन्हे
जिल्ह्यात वर्षभरात सहकार विभागाने ४४ ठिकाणी छापे टाकले. त्यातील १७ जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. त्यापैकी ६ जण अनधिकृत सावकारी करत असल्याचे निष्पन्न झाले आहे.