अमर पाटील -- कळंबा -कळंबा फिल्टर हाऊस प्रभाग ७७ हा नवीन पुनर्रचनेत दोन मतदारसंघांना एकत्रित करून तयार झालेला मतदारसंघ. अवघ्या तीन किलोमीटर परिक्षेत्रात १६ कॉलन्यांत विस्तारित मध्यमवर्गीयांचे प्राबल्य असणारा प्रभाग, असे याचे स्वरूप आहे. येथे प्रथमच दोन मातब्बर विद्यमान प्रतिनिधींनी कुटुंबातील महिलांना रिंगणात उतरवले आहे. राष्ट्रवादीकडून विद्यमान नगरसेवक सतीश लोळगे यांच्या पत्नी अश्विनी लोळगे, काँग्रेसकडून विद्यमान नगरसेवक मधुकर रामाणे यांच्या स्नुषा अश्विनी रामाणे, शिवसेनेकडून छाया मस्के, ताराराणी- भाजप आघाडीचा घटक पक्ष ‘स्वाभिमानी’कडून सुवर्णराधा साळोखे रिंगणात आहेत. गतवेळच्या कळंबा फिल्टर हाऊस प्रभागातील अठराशे मतदान या प्रभागात आल्याने त्याच्या जोरावर सतीश लोळगे यांच्या पत्नी राष्ट्रवादीकडून रिंगणात एकही पोस्टर न लावता ज्येष्ठ नागरिक, युवा मंडळे यांची मोट बांधून घर टू घर प्रचारयंत्रणा राबवत आहेत. विकासकामांच्या मुद्यावर त्यांनी प्रचार सुरू ठेवला आहे. या प्रभागातील बरेचसे मतदान नव्याने निर्माण झालेल्या रायगड कॉलनी प्रभागात गेले, तर जुन्या अडीच हजार मतांवर लक्ष केंद्रीत करून मधुकर रामाणे यांनी स्नुषा अश्विनी रामाणे यांना कॉंग्रेसच्या तिकिटावर रिंगणात उतरवले आहे. दहा वर्षे प्रभागाचे प्रतिनिधित्व, प्रचंड जनसंपर्क, विकासकामाचा धडाका, अडचणीस धावून येणारा, सासऱ्यांची पुण्याई, या अश्विनी रामाणे यांच्या जमेच्या बाजू आहेत. भाजपकडून इच्छुक तीन मातब्बरांना तिकीट डावलून ‘स्वाभिमानी’ने हा मतदारसंघ मिळवला. सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या पत्नी सुवर्णराधा साळोखे यांना उमेदवारी दिली पण तोवर प्रचारयंत्रणा खूप पुढे गेल्या. विकासकामाचा जाहीरनामा पत्रकवाटप करत घर टू घर त्या प्रचारात आहेत. छाया मस्के यांना शिवसेनेने रिंगणात उतरविले. बचत गटाच्या माध्यमातून महिलांच्या पाठिंब्यावर मतदारांशी थेट संपर्काद्वारे त्यांनी प्रचार सुरू ठेवलाय. ही निवडणूक महिला उमेदवाराकडून सूत्रे हलवणाऱ्या दोन मातब्बर नेत्यांमध्ये यांच्यात सरळ लढत होत आहे.
दिग्गजांमुळे विजयाचे गणित बनले अवघड
By admin | Published: October 24, 2015 1:00 AM