स्थानिक स्वराज्य मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून गेलेल्या २५ विधान परिषद सदस्यांचा कार्यकाळ ५ जानेवारीला संपुष्टात येत आहे. त्यामुळे कर्नाटकात विधान परिषदेच्या निवडणुका जानेवारीपूर्वी होतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. पण या विधान परिषद निवडणुकीत मतदार असलेल्या तालुका व जिल्हा पंचायतीच्या निवडणुका अद्याप झाल्या नसल्याने विधान परिषदेच्या पूर्वी तालुका पंचायत व जिल्हा पंचायतीच्या निवडणुका होणे क्रमप्राप्त आहे.
यामुळे जानेवारीपूर्वी तालुका व जिल्हा पंचायतीच्या निवडणुका होतील व त्यानंतर विधान परिषदेच्या निवडणुका होतील, अशी शक्यता आहे. दरम्यान विधान परिषदेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजप, काँग्रेस व धजद यांनी तयारी सुरू केली आहे.
कर्नाटक विधान परिषदेमध्ये असलेल्या ७५ पैकी २५ सदस्यांची निवड ही स्थानिक स्वराज्य संस्थेतून जिल्हानिहाय होते. बेळगाव जिल्ह्यातून सध्या महांतेश कवठगीमठ व विवेकराव पाटील हे विधान परिषदेचे सदस्य आहेत. या विधान परिषद निवडणुकीमध्ये ग्रामपंचायत सदस्य, नगरपालिका सदस्य, महानगरपालिका सदस्य, जिल्हा व तालुका पंचायत सदस्य हे मतदार म्हणून भूमिका बजावत असतात. सहा वर्षांपूर्वी झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत वीरकुमार पाटील यांना पराभव स्वीकारावा लागला होता. यामुळे भाजपचे महांतेश कवठगीमठ व अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेले विवेकराव पाटील यांचा विजय झाला होता. या दोन विधान परिषद सदस्यांचा कार्यकाल ५ जानेवारी अखेर संपणार आहे. त्यामुळे तत्पूर्वी विधान परिषदेच्या निवडणुका होतील, अशी शक्यता आहे.
येत्या निवडणुकीत भाजपकडून कवटगीमठ यांनाच उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे तर काँग्रेसकडून वीरकुमार पाटील यांनाच उमेदवारी मिळणार अशी चर्चा सुरू आहे.