कोल्हापूर : ढगफुटी, प्रचंड वेगाने येणारा पाण्याचा लोंढा, गोटवणारी थंडी अशा प्रतिकूल परिस्थितीवर मात करत कोल्हापूरच्या रणरागिणींनी ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’चा नारा देत विनागिअर दुचाकीवरून लेह लदाखची सफर केली.शहीद फौजदार राजू जाधव मेमोरिअल फौंडेशनच्या वतीने ग्रुप लिडर पोलीस निरीक्षक संजय जाधव व योगगुरू अरुण बेळगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम पार पडली. १५ जणांच्या या पथकात एका ज्येष्ठ दाम्पत्यासह अन्य दोघे सपत्नीक सहभागी झाले होते. या सर्वांनी १२ दिवसांत सुमारे १३०० किलोमीटर अंतर पार केले.फौंडेशनचे हिमालयात मोटारसायकल सफरीचे यंदाचे १३ वे वर्ष आहे. श्रीनगरहून सुरुवात झालेली ही सफर सोनमर्गमार्गे कारगिलला पोहोचली. येथून जोझीला पास, जिलेबो मोड, कॅप्टन मोडचे २० किलोमीटरचे अंतर पार करताना वेडीवाकडी व धोकादायक वळणे थरकाप उडविणारी होती.
मॅग्नेटिक हिल, मून लॅन्डची १४ हजार फूट उंची, खरदुंहलाहून नुब्रा व्हॅलीत आल्यानंतर सॅन्डडूल्सला सर्वांनी उंटाच्या सफारीचा आनंद लुटला. लेहच्या पुढच्या प्रवासात सर्च्यू, जिस्पाला जाताना मोरप्लेन या ४० किलोमीटर पट्ट्यात पाऊस, बोचरे वारे, शून्य अंश तापमानाचा सामना करत सर्वांनी जिस्पा गाव गाठले. येथे ग्रामस्थांना ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’चा संदेश देण्यात आला. येथून रोहतांग, मनाली मार्गे मंडीत आल्यानंतर सर्वांनी बसने परतीचा प्रवास सुरू केला.या मोहिमेत डॉ. दत्तात्रय चोपडे, पूजा चोपडे, ज्येष्ठ नागरिक शिवशंकर भस्मे, स्मिता भस्मे, असिस्टंट कमिशनर अनिल देसाई, निताली देसाई, महिला बालकल्याण व विकास अधिकारी मनीषा देसाई, रणजित ढवळे, प्रसाद मुंडले, पोलीस हवालदार संजय दळवी, सतीश पाटील (भोगावती), महेश दैव, शार्दुल पावनगडकर हे सहभागी झाले होते.