कोल्हापूर : जमीन खरेदीसाठी कमी व्याजात मोठी रक्कम देतो, असे आमिष दाखवून ९६ हजार रुपये घेऊन ते परत करण्यासाठी दिलेला धनादेश न वटल्याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशानुसार जुना राजवाडा पोलिसांनी शिवाजी पेठेतील भामट्यास शुक्रवारी (दि. २७) रात्री अटक केली. शशिकांत सदाशिव सुतार (वय ३७) असे त्याचे नाव आहे. दरम्यान, सुतार याने जमीन खरेदीबरोबरच परदेशात नोकरी लावतो, असे आमिष दाखवून सुमारे १८ लाखांची फसवणूक केल्याच्या तक्रारी अन्य सातजणांनी शनिवारी जुना राजवाडा पोलिसांत दिल्याने फसवणूक प्रकरणाची व्याप्ती वाढली आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले, अविनाश प्रभाकर पोवार (वय ४८, रा. आर. के.नगर) यांना शशिकांत सुतार याने मी जागाखरेदी विक्रीचा व्यवसाय करीत असून, हैदराबाद येथील एका नॅशनल बँकेशी माझे चांगले संबंध आहेत. आतापर्यंत अनेक लोकांना मी कमी व्याजात मोठी रक्कम मंजूर करून दिली असल्याचे सांगितले. त्यावर पोवार यांनी प्लॉट खरेदीसाठी कर्ज मिळण्यासाठी त्याच्याकडे मागणी केली. त्यावर त्याने फाईल मंजुरीसाठी त्यांच्याकडून वेळोवेळी ९६ हजार रुपये घेतले. पैसे घेऊनही कर्ज मिळत नसल्याने पोवार यांनी त्याच्याकडे पैसे परत करण्यासाठी तगादा लावला. यावेळी त्याने त्यांच्याकडून घेतलेल्या रकमेचा धनादेश दिला. तो धनादेश न वटल्याप्रकरणी पोवार यांनी त्याच्याविरोधात न्यायालयात तक्रार केली. न्यायालयाच्या आदेशानुसार जुना राजवाडा पोलिसांना सुतार याला अटक केली. (प्रतिनिधी)
नोकरीसह कर्जाच्या आमिषाने गंडा
By admin | Published: March 29, 2015 12:25 AM