नवे पारगाव : नवे पारगाव (ता. हातकणंगले) येथे धुतलेली कपडे वाळत घालत असताना चोरट्याने महिलेच्या गळ्यातील सोन्याच्या मंगळसूत्राला हिसका मारला. २५०० चे सोने घेऊन चोरट्याने मोटारसायकलवरून धूम ठोकली. घटना आज गुरुवारी दुपारी एकच्या सुमारास घडली. घटनेची नोंद वडगाव पोलिसात झाली आहे.
घटनास्थळ व पोलिसातून मिळालेली माहिती अशी जुने पारगाव मार्गावरील हनुमान मंदिर जवळ गावाच्या मुख्य भागात रेहाना मन्सूर मुल्ला यांचे घर आहे. घराजवळ त्या धुतलेली कपडे वाळत घालत होत्या. विनानंबरची मोटर सायकल घेऊन काळा टी शर्ट व निळी पॅन्ट परिधान केलेला तरुण तेथे आला. रस्त्याच्या कडेला मोटर सायकल लावून त्याने रेहाना यांच्या दंडाला धरले व दुसऱ्या हाताने मंगळसूत्राला हिसका मारला.
रेहाना यांनी आरडाओरडा केला तथापि चोरट्याने धूम ठोकली. चोरटा वाठारच्या दिशेने गेला. मुल्ला यांच्या शेजारी राहणाऱ्या निवास पाटील यांनी पाठलाग केला मात्र चोर सापडला नाही. वडगावच्या पोलीस उपनिरीक्षक अर्चना पाटील व हवालदार पतंगराव रेणुसे तपास करीत आहेत.