बोरवडे : सावर्डे बुद्रुक (ता.कागल) येथे मंगळवारी सकाळी सव्वासातच्या सुमारास ऊसतोडणीसाठी गेलेल्या दोन शेतकऱ्यांवर बिबट्याने हल्ला केल्याने ते जखमी झाले. तर शोधमोहिमेवेळी पंजा मारल्याने एक वनकर्मचारी जखमी झाला. रतन पाटील व पांडुरंग बुजरे (रा. सावर्डे बुद्रुक) असे शेतकऱ्यांचे, तर दत्तात्रय टिकले असे वनकर्मचाऱ्याचे नाव आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, सावर्डे बुद्रुक येथील विकासवाडी वस्तीशेजारी मारूती निकम यांच्या उसाची तोड सुरू आहे. तेथे रतन पाटील व पांडुरंग बुजरे हे ऊस तोडत होते. त्यावेळी अचानक उसातून आलेल्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. यामध्ये दोघांच्याही हाताला गंभीर इजा झाली. हल्ला होताच ऊस तोडणाऱ्या अन्य शेतकऱ्यांनी आरडा ओरड केल्याने बिबट्याने उसाच्या फडात धूम ठोकली. ही माहिती गावात कळताच ग्रामस्थांनी बिबट्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. प्रादेशिक वनविभागाला ही घटना कळविली. मात्र, तब्बल चार तासाने वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. वनपाल ए. डी. कल्याणकर यांनी हल्ला झालेले रतन पाटील व पांडुरंग बुजरे यांच्याकडून माहिती घेतली. त्यावेळी त्यांनी बिबट्याने आमच्यावर हल्ला केला. त्याचे पाय दोन्ही हातात मावत नव्हते, असे सांगितले. मात्र वनअधिकाऱ्यांनी हल्ला करणारा प्राणी तरस असेल, घाबरू नका, असे सांगत उसाच्या शेतात कुत्र्यांना सोडून तपासास सुरूवात केली. याचवेळी ग्रामस्थांनी बिबट्याला उसाच्या शेतातून उठविले. बिबट्या उसातून बाहेर येताच ग्रामस्थांनी व वनविभागाच्या कर्मचाऱ्यांची पळापळ सुरू झाली. यामध्ये वनकर्मचारी दत्तात्रय टिकले यांच्यावर बिबट्याने झडप घालून त्यांच्या पायावर पंजा मारला. यामध्ये ते जखमी झाले. ग्रामस्थांनी पुन्हा आरडाओरड केल्याने बिबट्या बिथरला आणि अशोक पताडे यांच्या उसाच्या शेतात लपला. त्यामुळे वनकर्मचाऱ्यांनी शेताच्या शेजारील घरातील नागरिकांना बाहेर काढले. ग्रामस्थांना पांगविले व बिबट्याला पकडण्यासाठी सापळा लावून त्यात बकरे ठेवले. मात्र, सायंकाळपर्यंत बिबट्या सापळ्यात आला नाही. घटनास्थळी वनविभाग व मुरगूड पोलिस तळ ठोकून होते. सध्या उन्हाळ्याची सुरूवात झाली आहे. विजेअभावी रात्रीही शेतकरी शेतात पाणी पाजण्यासाठी जातात. बिबट्या आढळल्याने त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. (वार्ताहर)नागरिकांचा अधिकाऱ्यांना जाबवनक्षेत्रपाल विश्वजित जाधव हे सकाळी तरस असल्याचे सांगत होते. पण बिबट्याला बघून ग्रामस्थांनी जाधव यांना बिबट्या आणि तरस यातला फरक तुम्हाला तरी माहीत आहे का? असा जाब विचारला.वनविभागाविरूद्ध तक्रारवनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी येताच या परिसरातील नागरिकांनी भरवस्तीत जंगली प्राण्याने हल्ला केल्याने आमच्या जिवाला धोका असल्याचे सांगत या प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली. हिंदुराव काशिद म्हणाले, आमची मुले शाळेला जातात. त्यावेळी वानरांकडून त्यांना धोका असल्याचे कळवूनही वनविभागाने त्याकडे अक्षम्य दुर्लक्ष केल्याचा आरोप केला. बिबट्या मंगळवारी सकाळी सावर्डे बुद्रुक परिसरात घुसल्यानंतर परिसरात पोलिसांनी शोध मोहीम राबवण्यात आली.
बिबट्याचा हल्ला; तीन जखमी
By admin | Published: February 08, 2017 1:08 AM