अनंत जाधव - सावंतवाडी -सह्याद्रीच्या परिसरात वाढत्या बिबट्यांच्या शिकारप्रकरणी यापूर्वी आवाज उठवूनही वनविभागाने दखल घेतली नसल्याने बिबट्यांना मारून कातडी विकण्याचा नवा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणात सांगेलीतील पाचजण सहभागी असल्याने परिसरात मृत पावलेल्या बिबट्यांच्या मृत्यूची प्रकरणे बाहेर येण्यास मदत होणार आहे. याची केवळ येथील उपवनसंरक्षकांनी निपक्षपातीपणे चौकशी करणे गरजेचे असून संशयास्पदरित्या मृत झालेल्या बिबट्यांची फाईल बंद प्रकरणे बाहेर काढण्यात यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. कारण अनेक बिबट्यांचे मृत्यू हे पैशांच्या लोभापोटीच झाल्याचे दिसून येत आहेत. सांगेलीतील एका वाडीतून बिबट्याची शिकार करून त्याची कातडी विक्रीसाठी इस्लामपूर येथे नेत असताना गडहिंग्लज पोलिसांनी आठजणांना आंबोली- आजरा मार्गावरील आजरा तालुक्यातील गवसे येथे अटक केली होती. यात बहुतेक आरोपी सावंतवाडी तालुक्यातील सांगेली परिसरातील आहेत. यामध्ये अंजली नार्वेकर, नीलेश नार्वेकर, विशाल नार्वेकर, चंद्रकांत राऊळ व सुदर्शन राऊळ आदींचा समावेश आहे. सांगेलीत बिबटा मारल्यानंतर त्याची कातडी इस्लामपूर येथील ग्राहाकाला विकायला नेत असताना हे बिंग फुटले. त्यामुळे हा सर्व प्रकार उघडकीस आला. गेल्या काही वर्षात सह्याद्रीच्या परिसरात मोठ्या प्रमाणात बिबट्यासह अन्य प्राण्यांच्या शिकारी झाल्या आहेत. यातील काही शिकारी उघडकीस आल्या आहेत. तर काही ठिकाणी प्राण्यांचे अवशेष जमा करण्यात वनविभागाने धन्यता मानली आहे.देवसू, दाणोली, केसरी, फणसवडे, सांगेली, कलंबिस्त या जंगलात मोठ्या प्रमाणात शिकारी केल्या जातात. अनेकवेळा याबाबत ग्रामस्थांकडून आवाजही उठविण्यात आला होता. पण त्याकडे वनविभागाने पुरते दुर्लक्ष केल्यामुळे शिकारीत वाढ झाली आहे. कलंबिस्तसह अन्य भागात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाली आहे. त्याकडेही प्रशासनाने दुर्लक्ष केले. तसेच वन्य प्राण्याच्या हत्त्येकडेही वनविभागाने दुर्लक्ष केल्याने आता बिबट्यांची शिकार झाल्याचे पुढे आले आहे.बिबट्यांच्या मृत्यूची फाईल बंद प्रकरणे शोधणे गरजेचेसह्याद्रीच्या परिसरात मोठ्या प्रमाणात बिबट्यांचे मृत्यू झाले आहेत. यातील अनेक बिबट्यांच्या मृत्यूमागे संशयाला वाव आहे. बिबट्यांचे मृत्यू हे शिकारीच्या उद्देशानेच झाल्याचे दिसून आले. मात्र, त्यानंतरही अन्य काहीच माहिती मिळत नसल्याने वनविभागाने अनेक प्रकरणे फाईल बंद केली आहेत. अशा बिबट्यांच्या संशयास्पद मृत्यूंच्या फाईल पुन्हा रिओपन केल्यास अनेक शिकारी हाती लागू शकतात. सांगेलीतील बिबट्याच्या शिकारीच्या प्रकरणाचा धागा पकडून अनेक प्रकरणांची चिरफाड केली जाऊ शकते आणि सत्य बाहेर येऊ शकते.वाघानंतर बिबट्याच्या कातडीला महत्त्वयापूर्वी अनेकवेळा वाघाच्या कातडीची चोरटी वाहतूक करताना संशयितांना पकडण्यात येत होते. पण अनेक शिकारी वाघाच्या नावाखाली बिबट्याची कातडी खपवतात. ज्यांना हा सौदा कळतो, तो गप्प राहतो अन्यथा काहीजण फसवणुकीच्या नावाखाली याची माहिती अन्यत्र पुरवतात. तसाच काहीसा सांगेलीतील प्रकार असल्याचे बोलले जात आहे. बाजारात वाघाच्या कातडीला मोठे महत्त्व आहे. साधारणत: पाच लाखांपर्यंत ही कातडी विकली जाते. तर बिबट्याची कातडी ही जास्तीत जास्त तीन लाखांपर्यत विकली जाते.सांगेली कनेक्शनची चौकशी होणार : सहाय्यक उपवनसंरक्षककातडे सापडलेल्या बिबट्याची सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुठेही हत्या झाली असेल तर चौकशी केली जाणार. ही चौकशी आम्ही आमच्या विभागामार्फत करणार असल्याचे मत फिरत्या पथकाचे प्रमुख प्रकाश बागेवाडी यांनी व्यक्त केले आहे.
बिबट्यांची शिकार पैशांसाठी
By admin | Published: October 26, 2014 10:02 PM