अनिल पाटील सरुड : सरुड येथील बिरदेव माळ परिसरातील ऊसाच्या शेतात बिबट्याच्या पायाचे ठसे आढळून आल्याने या परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे स्पष्ट झाले. यामुळे शेतकऱ्यांच्यात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिरदेव माळाच्या पुर्वेकडील बाजूस विश्वास कदम यांचे ऊसाचे शेत आहे. गुरुवारी दुपारी कदम यांचा मुलगा विजय कदम शेतात गेले असता त्यांना शेतातील सरीमध्ये ठिक ठिकाणी प्राण्याच्या पायाचे ठसे दिसले. त्यांनी हे फोटो काढुन मलकापूर वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी अमित भोसले यांना पाठविले. वनअधिकारी भोसले यांनी हे ठसे बिबट्याच्या पायाचे असल्याचे सांगितले. सरुडमधील बहुतांश शेतकऱ्यांची दुभती जनावरे बिरदेव माळ परिसरात आहेत. तसेच या परिसराला लागुनच खामकरवाडी येथे नागरी वस्ती आहे. बिबट्याकडुन येथील जनावरांच्यावर हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे येथील शेतकऱ्यांच्यात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.दरम्यान या परिसरातील शेतकर्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून एकट्याने शेतात जाऊ नये तसेच आप आपली जनावरे बंदिस्त शेडमध्ये बांधावीत असे आवाहन वनविभागाच्यावतीने करण्यात आले आहे.
Kolhapur News: सरुड परिसरात बिबट्याचा वावर, शेतात आढळले पायाचे ठसे
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2023 12:56 PM