राधानगरी : नागरीवस्तीत बिबट्या, गवा, टस्कर आदी. प्राण्यांचा वावर वाढला आहे. अनेक ठिकाणी वन्यप्राण्यांनी नागरिकांसह पाळीव प्राण्यावर हल्ले चढवल्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. यातच राधानगरी अभयारण्य परिसरातील न्य करंजे परिसरात मानवीवस्तीत बिबट्याचा वावर आढळून आला आहे. बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एक वासरु जखमी झाले आहे. ही घटना काल, गुरुवारी रात्रीच्या सुमारास घडली.न्यू करंजे येथील बाबाजी सकाराम सुतार यांच्या घराच्या मागच्या बाजूने बिबट्याने प्रवेश करीत वासरावर हल्ला केला. या हल्ल्यात वासरु जखमी झाले. गाईच्या हंबरड्याने व कुत्र्याच्या भुंकण्याने घरातील लोक जागे झाल्यानंतर परिसरातील गोधळाने बिबट्या जंगलात पळून गेला. ही घटना काल, गुरुवारी रात्रीच्या सुमारास घडली. पहाटेच्या सुमारास हा बिबट्या पुन्हा नागरिकांच्या निदर्शनास आला. यामुळे परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.न्यु करंजे हे गाव राधानगरी अभयारण्य क्षेत्रात येथे. या गावातील काही लोकांनी ऐच्छिक पुनर्वसन केले आहे. तर काही लोकांना अद्याप ही पुनर्वसनाचा मोबदला मिळालेला नाही यामुळे काही नागरिक येथेच वास्तवास आहेत. याठिकाणी गेल्या अनेक वर्षात वन्यप्राण्यांचे हल्ले वाढले आहेत. यावर वेळीच उपाययोजना करण्याची गरज आहे.
राधानगरीत नागरीवस्तीमध्ये बिबट्याचा वावर, हल्ल्यात वासरू जखमी; परिसरात घबराट
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2022 11:26 AM