आदित्य वेल्हाळ
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोल्हापूर वनपरिक्षेत्रात कायमस्वरूपी शासकीय पशुवैद्यकीय अधिकारीच नसल्याने गेल्या वर्षभरात बिबट्या, साळिंदर, सांबर, खवले मांजर, वानर अशा अनेक जखमी प्राण्यांना जीव गमवावा लागला आहे. मानद वैद्यकीय डॉक्टरांकडून वेळेत उपचार होतीलच असे नाही. मृत प्राण्यांचे शवविच्छेदन करण्याचा अधिकार नसताना मानद डॉक्टरांकडून ते झाल्याचे उघडकीस आले आहे. वनविभाग मात्र याबाबत अनभिज्ञ आहे.
पश्चिम घाटात येणाऱ्या कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांतील वनक्षेत्रात लाखो वन्यजीवांचा अधिवास आहे. येथील जखमी वन्यजीवांवर कोल्हापुरातील सोनतळी येथे उपचार केले जातात. त्याकरिता मानद सेवा देणारे एक पशुवैद्यकीय अधिकारी व दोन सहायक येथे काम करीत आहेत. येथे गेल्या वर्षभरात एक हजारांहून अधिक वन्यजीव व पक्षी उपचारासाठी दाखल झाले होते. त्यातील अनेक वन्यजीवांना योग्य उपचाराअभावी आपले प्राण गमवावे लागले असल्याचा आरोप प्राणिमित्रांकडून होत आहे. यात बिबट्या, साळिंदर, सांबर, वानर, खवले मांजर, शेकरू, तरस, आदींचा समावेश असल्याचे सांगितले जाते. विशेष म्हणजे महाबळेश्वर (जि.सातारा) येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत जखमी झालेल्या बिबट्याला उपचारासाठी १९ फेब्रुवारी २०२० रोजी या उपचार केंद्रात आणले. त्याच्यावर सहा दिवस उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. शासकीय पशुवैद्यकीय अधिकारी नसताना त्याचे शवविच्छेदन केले गेले. साताऱ्यातूनच ९ फेब्रुवारी २०२१ला श्वानाने हल्ला केलेले सांबर उपचारासाठी आणण्यात आले होते. त्याचाही अशाच पद्धतीने मृत्यू झाला. त्यानंतर १७ फेब्रुवारीला जेऊर (ता.पन्हाळा) गरोदर साळिंदर रस्ते अपघातात मरण पावले. त्याच्या पोटातील एक पिल्लू जगले. हे पिल्लू तेथील नागरिकांनी वनविभागाकडे सुपूर्द केले. मात्र, योग्य आहाराअभावी त्याचाही मृत्यू झाल्याचे सांगितले जाते. रत्नागिरीत ३ ऑक्टोबर २०२० रोजी तोंडाला जखम झालेल्या अजगराला आणण्यात आले होते. उपचारानंतर तो बराही झाला. मात्र, त्याला त्याच्या अधिवासात अद्याप सोडलेले नाही. गेल्या पाच महिन्यांपासून या केंद्रातील एका पेटीत बंदिस्त असल्याने अजगर बारीक झाला आहे. मानद वैद्यकीय अधिकाऱ्याकडून योग्य उपचार होत नसतील तर तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्याकडे त्या प्राण्याचे हस्तांतरण करणे गरजेचे असले तरी वनविभाग मात्र हातावर हात ठेवून बसला आहे. त्यामुळे आता या उपचार केंद्रावरच उपचार करण्याची वेळ आल्याची भावना वन्य प्राणिमित्रांकडून व्यक्त होत आहे.
- पाॅइंटर
- या उपचार केंद्रातील मानद वैद्यकीय अधिकारी येथे काम करीत आहेत. मात्र, त्यांना प्रशिक्षित नसलेले दोन सहायक आहेत.
- वन्यजीवाला बेशुद्ध करण्यासाठी शासनमान्य अधिकृत केलेला वैद्यकीय अधिकारी लागतो. मात्र, हेही काम येथील मानद डॉक्टरांना करावे लागते.
- वन्यजीवांचे शवविच्छेदन अधिकृत वैद्यकीय अधिकाऱ्याने करणे कायद्याने बंधनकारक असताना तेही काम येथील मानद डॉक्टरांकडून केले जाते. या प्राण्यांची परस्पर विल्हेवाटही लावली जाते.
कोट -
उपचार केंद्रातील वन्यजीवांचा मृत्यू झाल्यास शासकीय पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनीच शवविच्छेदन करणे बंधनकारक आहे. असे प्रकार येथे घडत असतील तर संबधितांवर निश्चित कारवाई केली जाईल.
- रावसाहेब काळे, उपवनसंरक्षक, वनविभाग, कोल्हापूर
फोटो : २७०२०२०२१-कोल-बिबट्या०२
ओळी : सोनतळी (ता. करवीर) येथील वनविभागाच्या वन्यजीव उपचार केंद्रात बिबट्याचे शवविच्छेदन झाल्यानंतर त्याची परस्पर विल्हेवाट लावण्यात आली.
फोटो : २७०२२०२१-कोल-अजगर
ओळी : उपचार होऊन बरा झालेला अजगर गेली पाच महिने काचेच्या पेटीत नैसर्गिक अधिवासात जाण्याच्या प्रतीक्षेत आहे.