अनिल पाटीलसरुड : सरुड परिसरात बिबट्याच्या धुमाकुळ सुरुच आहे. बिबट्याने काल, बुधवारी रात्री वडगाव येथील महादेव बाजीराव पाटील यांच्या एका वासराचा, शेळीचा फडशा पाडला. यापुर्वी या परिसरात जनावरांवर हल्ला झाला नव्हता. दरम्यान आज, गुरुवारी सकाळी सरुड पैकी खोतवाडी येथे एका बेटामध्ये बिबट्याच्या नर, मादी जोडीसह व त्यांचे बछडे स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आलीत. यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. या परिसरात भक्ष्य मिळू लागल्याने बिबट्याने याठिकाणी तळ ठोकला आहे. यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे.महादेव पाटील यांचे वडगाव-कापशी मार्गावर घर आहे. घराशेजारीच जनावरांचे शेड आहे. या शेडमध्ये असणाऱ्या एका शेळीवर व देशी गायच्या वासरावर बिबट्याने हल्ला करत फडशा पाडला. आज, गुरुवारी सकाळी पाटील यांच्या निदर्शनास हा प्रकार आला. बिबट्याकडून पाळीव जनावरांच्यावर हल्ले होऊ लागल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे.बेटातुन ऊसाच्या शेतात पसारसरुड पैकी खोतवाडी येथे नर, मादी बिबट्याची जोडी व दोन बछडे एकत्रितपणे वास्तव्यास असल्याचे नागरिकांना दिसून आले. नागरिकांची चाहुल लागताच ते बेटातुन उसाच्या शेतामध्ये पसार झाले. यापूर्वी या परिसरात केवळ बिबट्या व त्याची दोन पिल्ले असल्याचे सांगितले जात होते. परंतु यांच्या बरोबर एक नर बिबट्याही असल्याचा अंदाज आहे.
कोल्हापूर: सरुड परिसरात बिबट्याचा धुमाकुळ सुरूच, जनावरांचा पाडतोय फडशा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2022 6:36 PM