कारखाना परिसरातील ऊस वाहतूक प्रामुख्याने बैलगाडीने केली जाते; पण बैलगाडी हाकणाऱ्या मजुरांची संख्या कमी असल्यामुळे कारखान्याजवळचा ऊसही ट्रॅक्टर-ट्रॉलीतून आणावा लागत आहे. गेल्या वर्षी ट्रक, ट्रॉली व बैलगाड्यांची संख्या भरपूर असल्यामुळे ऊस भरून आलेली वाहने गाळपासाठी बारा ते चोवीस तास वाहनतळावर उभी राहत होती. याउलट यावर्षी ऊस भरून आलेले वाहन दोन तासांतच खाली होत आहे.
याबाबत हुपरी येथील जवाहर साखर कारखान्याचे मुख्य शेती अधिकारी किरण कांबळे यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले कोरोनाच्या संकटामुळे ऊसतोड मजुरांची संख्या कमी झाली आहे. परिणामी गाळपासाठी आवश्यक असलेला ऊस उपलब्ध करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. कारखान्याने ऊसतोडीसाठी ऊस हार्वेस्टिंग ३६ मशीनची व्यवस्था केली आहे. त्यामुळे दैनंदिन गाळपासाठी आवश्यक असलेला ऊस उपलब्ध होत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत साखर उताराही १२ टक्क्यांपेक्षा जास्त मिळत आहे, ही साखर कारखान्याच्या दृष्टीने जमेची बाजू आहे.
---------::--------
फोटो ओळी - कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर चालू वर्षीच्या ऊस गळीत हंगामासाठी ऊसतोड मजुरांच्या टोळ्या कमी आल्यामुळे अनेक साखर कारखान्यांवरील वाहन (गाडी अड्डा) तळावरील बैलगाड्या जास्त संख्येने अड्ड्यात पडून आहेत.