कोल्हापूर : जिल्ह्यात सोमवारी सकाळपासून पावसाची उघडझाप राहिली. अधूनमधून सरी कोसळत असल्या तरी काही काळ ऊन पडत होते. त्यामुळे श्रावणासारखा ऊन-पावसाचा खेळ पाहावयास मिळाला. धरण क्षेत्रातही पावसाचा जोर कमी झाला असून, संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या दुधगंगा धरण अखेर ७० टक्के भरले आहे. पाऊस कमी झाल्याने नद्यांच्या पुराचे पाणी झपाट्याने कमी होत असून, पंचगंगेची पाणी पातळी दिवसभरात साडेतीन फुटाने कमी झाली.गेल्या दोन-तीन दिवस जिल्ह्यात पाऊस कमी आहे. सोमवारी सकाळी जिल्ह्याच्या पश्चिमेकडील तालुक्यात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या; पण लगेचच आकाश मोकळे व्हायचे. दिवसभरात असेच वातावरण राहिले. अधूनमधून जोरदार सरी यायच्या मात्र, लगेच उघडीप व्हायची. धरण क्षेत्रातही पावसाचा जोर कमी झाला आहे. येथे सरासरी ४० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. गळतीसाठी उन्हाळ्यात दुधगंगा धरण मोकळे केले होते. त्यात जून महिना काेरडा गेल्याने धरण भरते की नाही, याविषयी कोल्हापूरकरांना काळजी होती. जुलै महिन्यात झालेल्या धुवाधार पावसाने धरणात झपाट्याने पाणीसाठा वाढत गेला. सोमवारी सायंकाळी पाचपर्यंत दुधगंगा धरण ७० टक्के भरले होते. पाऊस कमी असल्याने पंचगंगा नदीचे पातळी दिवसभरात साडेतीन फुटाने कमी झाली. सध्या ३४.१० फुटावर पंचगंगा असून २७ बंधारे पाण्याखाली आहेत.
पडझडीत ५० हजारांचे नुकसानजिल्ह्यात साेमवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासात ४ खासगी मालमत्तांची पडझड झाली. यामध्ये ५० हजारांचे नुकसान झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.राधानगरीचे दोन स्वयंचलित दरवाजे खुलेपावसाचा जोर कमी झाला असला तरी राधानगरी धरण पुर्ण क्षमतेने भरल्याने धरणाचे स्वयंचलित दरवाजे खुले आहेत. सद्या दोन धरवाजे खुले असल्याने स्वयंचलित दरवाजातून २८२८ क्युसेक तर पॉवर हाऊसमधून १४०० क्युसेक असा एकूण विसर्ग ४२२८ क्युसेकने धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे.