वयाची सत्तरी येऊन ठेपल्यावर ‘आयुष्यात आता नवीन काही शिकायचे राहिले नाही. तेव्हा माझी विद्यार्थीदशा आता संपली’, असं मला ठामपणे वाटायला लागलं होतं. त्यामुळे नव्या पिढीशी बोलताना ‘मी तुझ्यापेक्षा चार पावसाळे जास्त पाहिले आहेत, तेव्हा तू माझे निमूटपणे ऐकायला हवंस’, असा छुपा पवित्रा माझ्या बोलण्यात डोकावायला लागला होता. ह्या फुग्याला कधी टाचणी लागेल, असे मला वाटलं नव्हतं; पण जीवन ही एक फारच गंमतीदार, विलक्षण आणि विविधरंगी गोष्ट आहे हेच खरं! ते आपल्याला कायम विद्यार्थीपण सोडू देत नाही. सक्त शिक्षकाच्या भूमिकेत राहून नवे-नवे धडे देते आणि त्याचा गृहपाठही करायला लावते. याचा अनुभव घेतलाय, म्हणूनच बोलतेय मी!त्याचं झालं असं की, घरातल्या नव्या गुळगुळीत फरश्यांना आणि माझ्या वाढत्या वयाला-म्हणजे दुसरे बालपण की काय म्हणता ना त्याला अनुसरून दर आठवड्याला सरासरी एकदा या दरानं माझा पडण्याचा कार्यक्रम सुरू होता. कधी ‘धप्प’ असा जोरात आवाज करून, तर कधी जिन्याला साष्टांग नमस्कार घालत, पण सायलेंट मोडवर! पण इतक्या वेळा पडूनही किरकोळ खरचटण्याव्यतिरिक्त काही झालं नाही, त्यामुळं माझं दुसरं बालपण मजेत चाललं होतं. त्यामुळं ‘आपली हाड फारच बळकट असून कशी पडले तरी मला कधीच काही होणार नाही’ या फाजील आत्मविश्वासानं मी बेफिकीर बनले होते.पण तो ‘धडाबाज’ सुदिन उजाडलाच, बाथरूममधून ओलेत्या पायांनी घाईघाईनं बाहेर आले अन् एक पायरी खाली असलेल्या फरशीवर पाय ठेवते ना ठेवते, तोच मी घसरून पडले. नेहमीसारखीच पडले तरी लगेच उठायला गेले, तर लक्षात आलं, माझा गरीब बिच्चारा बाथरूमचा दाराच्या चौकटीला माझा उजवा हात जोरात घसरून बाथरूमच्या उंबऱ्याला आपटून पुढं आला तो पार तिरका होऊनच! अंगठ्याचा आणि चाफेकळीचा भाग जुडी होऊन वर उचललेला. पंजा ताणून मी तो सरळ करायचा प्रयत्न केला, पण तो आपला ढिम्मच... मला पहिला धडा शिकवणारा तो हाच क्षण.मग हॉस्पिटल, अॅनास्थेशिया, प्लास्टर वगैरे सोपस्कर होऊन मी घरी आले ती जराश्या गुंगीतच! सकाळी जाग आल्यावर प्लास्टरनं जडशीळ झालेल्या हाताकडं तितक्याच जड मनानं मी पाहत राहिले. एक मिनिटानं भानावर आले, तर ब्रशवर पेस्ट घेऊन माझा डावा हात अचूकपणे तोंडाकडं जाण्याच्या प्रयत्नात होता. त्याला नीट कामाला लावलं. त्याचा बिचाऱ्याचा नाईलाज होता. असली कामं करायची त्याला कधी सवयच नव्हती मी लावली.मग हळूहळू केस विचरणं, अंघोळ करणं, कपडे घालणं, अशी सगळीच काम तो चुकतमाकत एकहाती करायला लागला. इतरांकडून तरी काय-काय करून घेणार? पण त्यातही बेट्यानं छोट्या-छोट्या नामी युक्त्या शोधून काढल्या; पण भाजी चिरणं, कणिक भिजवणं, पोळ्या करणं, कुकर लावणं ही कामं फारच अवघड होती. एक दोन दिवस घरातल्या बाकीच्या डाव्या हातांनी ती केली, पण लवकरच ते कंटाळले. मग स्वयंपाकाची बाई आली, पण तिच्या हातच्या चवीशी जमवून घ्यावं लागलंच.एकूण काय माझ्या या दुखण्यानं आम्हाला सगळ्यांनाच जगण्यातले नवे धडे शिकवले. म्हणून तर मी आता वयाला साजेसं जपून, सावकाश, नीट खाली बघून चालते, घरातले सदस्य पदार्थांना नाव न ठेवता जेवतात. घरकामाला कमी लेखत नाहीत. माझं महत्त्व ओळखून मला आदरानं वागवतात आणि मुख्य म्हणजे घरातली काही कामं ते आपण होऊन करतात. मी आधी म्हटल्याप्रमाणं जीवनानं आम्हाला सगळ्यांनाच हा नवा धडा शिकवला आहे. कायमसाठी! पण तो आम्ही आधीच शिकलो असतो, तर किती बरं झालं असतं.- वैशाली गोखले, कोल्हापूर.
दुखण्याचा धडा...
By admin | Published: February 20, 2017 12:29 AM