नूल : जिल्हा क्रीडा कार्यालयातर्फे नूल (ता. गडहिंग्लज) येथे नुकत्याच जिल्हास्तरीय १७ वर्षांखालील मुलांच्या ज्युनिअर जवाहरलाल नेहरू चषक हॉकी स्पर्धा पार पडल्या. मात्र, ग्रामीण भागात स्पर्धेचे ठिकाण असल्याने जिल्ह्यातील बऱ्याच हॉकी संघांनी या स्पर्धेकडे पाठ फिरविली. त्यामुळे संयोजकांना ही स्पर्धा दोन दिवसांतच गुंडाळावी लागली. याबाबत हॉकीप्रेमींतून नाराजी व्यक्त होत आहे.ग्रामीण भागातील हॉकीची पंढरी म्हणून ‘नूल’ गावची राज्यात ओळख आहे. ग्रामीण भागात या खेळाचा प्रसार होण्यासाठी जिल्हा क्रीडा कार्यालयाने ही स्पर्धा नूल येथे प्रथमच भरवली. सब ज्युनिअर (१५ वर्षे) आणि ज्युनिअर गटात (१७ वर्षे) ही स्पर्धा झाली. ज्युनिअर गट वगळता अन्य गटात चांगला प्रतिसाद लाभला. ज्युनिअर (१७ वर्षे) गटात कोल्हापूर जिल्ह्यात १३ संघ दरवर्षी सहभागी होतात. कोल्हापूर येथे मेजर ध्यानचंद्र हॉकी मैदानावर या स्पर्धा घेतल्या जातात. मात्र नूल येथील स्पर्धेत केवळ सहा शाळांचे संघ सहभागी झाले होते. डी. सी. नरके विद्यानिकेतन कुडित्रे, छत्रपती शिवाजी ज्युनिअर कॉलेज पन्हाळा, आदर्श विद्यानिकेतन मिणचे, छत्रपती शाहू हायस्कूल भोगावती परिते, व्यंकटेश्वरा इंग्लिश स्कूल इचलकरंजी, संजीवन विद्यानिकेतन पन्हाळ या सहा संघांनी स्पर्धेत ‘जान’ आणली. शहरापासून ८० कि.मी अंतराव ही स्पर्धा होते. मात्र, सहभाग नोंदविला नाही. संबंधित शाळाच्या प्राचार्यांनी ही स्पर्धा खेळण्यास परवानगी नाकारली. वास्तविक नूल येथे खेळास योग्य असे मैदान उपलब्ध आहे. संयोजकांनी निवास व भोजनाची सोय केली होती. प्रवासाचा मार्गदेखील सोयीचा असताना हे संघ का सहभागी होऊ शकले नाहीत, असा सवाल हॉकीप्रेमींतून उपस्थित होत आहे. संबंधित संघ हे पब्लिक स्कूलचे असताना प्रवास खर्च किंवा वाहनांची काहीच अडचण नव्हती. मात्र, संघाच्या अल्प प्रतिसादाने संयोजकांच्या उत्साहावर पाणी पडले हे मात्र नक्की.हॉकी हा राष्ट्रीय खेळ आहे. ग्रामीण भागात या खेळाचा प्रचार व प्रसार होण्यासाठी स्पर्धा खेडेगावात भरवल्या पाहिजेत. सर्वच संघांनी स्पर्धेस प्रतिसाद दिला पाहिजे.- उदय पोवार, शासकीय हॉकी कोच, कोल्हापूर
नेहरू चषक ज्युनिअर हॉकी स्पर्धा मुलांच्या संघाची पाठ
By admin | Published: September 15, 2014 11:08 PM