भीमगोंडा देसाई --कोल्हापूर---येथील छत्रपती राजर्षी शाहू महाविद्यालयातील तरुणींना आरोग्यविषयक मूलभूत शिक्षणाचे धडे दिले जात आहेत, असे शिक्षण देणारे देशातील हे पहिले महाविद्यालय आहे, असा दावा प्राचार्य राजेंद्र कुंभार यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला आहे. सध्या ३०० तरुणी आरोग्य शिक्षण घेत आहेत.‘महिला आरोग्य आणि स्वच्छता’ या विषयावर विविध पातळीवर नेहमी चर्चा होत असते. मात्र, प्रत्यक्षात कृती शून्य असते. महाविद्यालयीन वयात तरुणींमध्ये मानसिक, शारीरिक बदल होत असतात. अशावेळी त्यांना आरोग्याबद्दल शिक्षण देणे गरजेचे असते; परंतु, हा संवेदनशील विषय असल्यामुळे यासंंबंधी बोलणेही टाळले जाते. शैक्षणिक अभ्यासक्रमांतूनही याबाबत सविस्तर माहिती मिळत नाही. शास्त्रोक्त माहिती मिळत नसल्यामुळे अनेक माध्यमांतून मिळणाऱ्या उपलब्ध माहिती कुतुहलापोटी घेतली जाते. त्यामुळे पूर्ण ज्ञान मिळत नाही. परिणामी भविष्यात अज्ञानापोटी अनेक आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे मुलींना आरोग्यविषयक प्रशिक्षण देण्यासाठी कदमवाडीतील डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलशी महाविद्यालयाने करार केला आहे. दरम्यान, महाविद्यालयातील आर्टस्, कॉमर्स, सायन्स या अभ्यासक्रमांतील पहिल्या वर्षाच्या तरुणींना आरोग्यविषयक माहिती व प्रशिक्षण सक्तीचे केले आहे. हा अभ्यासक्रम १२० तासांचा आहे. त्यामध्ये ८० तास थेअरी आणि ४० तासांचे प्रशिक्षण दिले जात आहे. कोर्सतर्गंत तरुणींना रुग्णालयात नेऊन बाळंतपण, मासिक पाळी, महिलांचे आजार, किशोरवयीन अवस्थेतील शारीरिक बदल, बालकांच्या आरोग्याविषयी घ्यावयाची काळजी व पोषण यासंबंधी शास्त्रोक्त प्रशिक्षण दिले जात आहे. डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलसह जिल्हा परिषदेच्या इस्पुर्ली (ता. करवीर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात तरुणींना नेऊन तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांतर्फे माहिती दिली जात आहे. यासाठी तरुणींकडून वर्षासाठी नाममात्र ५०० रुपये फी घेतली जात आहे. नियमित अभ्यासक्रमाशिवाय हे प्रशिक्षण दिले जात आहे म्हणून अन्य महाविद्यालयेही ‘शाहू’शी संपर्क साधून माहिती घेत आहेत. अतिशय कमी फीमध्ये आरोग्याविषयी प्रशिक्षण तरुणींना दिले जाते. आरोग्यविषयक माहिती नसल्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे सर्व तरुणींना आरोग्याचे धडे देणारे देशातील आमचे पहिले महाविद्यालय आहे. - डॉ. राजेंद्र कुंभार, प्राचार्य, शाहू महाविद्यालय, कोल्हापूर
शाहू महाविद्यालयामध्ये आरोग्य शिक्षणाचे धडे
By admin | Published: October 05, 2015 12:47 AM