मुरगूड : महाराष्ट्रात जाती भेदांच्या भिंती हजारो वर्षांपूर्वीच वारकरी सांप्रदायाने गाडल्या आहेत. गोरगरिबांचे कैवारी म्हणून राज्यात श्रावणबाळ नावाने ओळख निर्माण करणाऱ्या हसन मुश्रीफ यांच्या सर्व आशा आकांक्षा पूर्ण होऊ देत, असा आशीर्वाद ह.भ.प. निवृत्ती देशमुख इंदोरीकर महाराज यांनी दिला.मुरगूड (ता. कागल) येथे हसन मुश्रीफ फौंडेशनच्यावतीने आयोजित वारकरी महामेळाव्यात ते बोलत होते. मेळाव्याला २५ हजारांहून जास्त वारकऱ्यांनी हजेरी लावली होती. उत्साहपूर्ण महामेळाव्याला संबोधित करताना ते म्हणाले, चांगले काम करणाऱ्याला कृपया बदनाम करू नका. ज्याचा त्याचा प्रारब्ध ठरलेला असतो. दान, धर्म नसणाऱ्या घराण्याला समाजात किंमत नसतेच. समाजाच्या हितासाठी अशा माणसांना ओळखून खड्यासारखे बाजूला करा. गोरगरीब माणूस पैशांनी श्रीमंत नसला तरी तो स्वाभिमानी विचाराचा असतो. कोणाला मोठं करा म्हणून मोठं करता येत नाही, असे सांगून मुश्रीफांनी हा वारकरी महामेळावा आयोजित केल्याबद्दल त्यांचे कौतुक करत पुढील वर्षांपासून गोरगरिबांचा सामुदायिक विवाह सोहळाही आयोजित करा, असे त्यांनी सुचवले. दोन तासांच्या भक्तिमय वातावरणात त्यांनी मार्मिकतेने समाजातील आधुनिक रुढी-परंपरा यावर आपल्या शैलीत प्रबोधन केले.यावेळी बोलताना हसन मुश्रीफ म्हणाले, वारकरी सांप्रदाय आणि माझा संबंध हा योगायोग नसून, गेल्या अनेक वर्षांपासून आपण या सांप्रदायाशी जोडलो गेलो आहे. मी वारकरी बंधूंची सेवा करण्याचा प्रयत्न केला आहे. हा मेळावा पाहून आपण भारावून गेलो आहे. शस्त्रक्रियांच्या माध्यमातून माझ्या हातून झालेल्या कामाचे फार मोठे समाधान आहे. कधीच आपण जात-पात आडवी येऊ दिली नाही. पुढेही मला संधी द्या, असे आवाहन त्यांनी केले.जगन्नाथ महाराज यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी रणजितसिंह पाटील, प्रवीणसिंह पाटील यांच्यासह काही प्रवचनकार व कीर्तनकारांनी आपले मनोगत व्यक्त केले. मेळाव्यास भानुदास यादव महाराज, काजवे महाराज, तुकाराम चव्हाण, ह.भ.प. बुधले, भैया माने, युवराज पाटील, नगराध्यक्षा माया चौगले, नगराध्यक्षा लक्ष्मी घुगरे, आशाकाकी माने, शामराव पाटील यमगेकर, वसंतराव शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. सिंधुताई व इंदोरीकरांना धमकीमहिला मेळाव्यासाठी कागलमध्ये येणाऱ्या सिंधुताई सपकाळ यांना मेळावा उधळण्याची धमकी दिली होती. तसाच प्रकार इंदोरीकरांच्याबाबतीत झाला; पण समाज प्रबोधनकार इंदोरीकर महाराज हे कशाचीही तमा न बाळगता वारकरी महामेळाव्याला आल्याबद्दल मुश्रीफांनी त्यांचे जाहीर आभार मानले.तांदळासारख्या दिसणाऱ्या गारा बाहेर काढाराष्ट्रीय कीर्तनकार भाऊसाहेब महाराज म्हणाले, वारकरी सांप्रदायाचा मान राखण्याचे काम मुश्रीफांनी केले. मेळाव्याला येऊ नये म्हणून आपल्याला अनेकांनी अडचणी निर्माण केल्या. ते कोण आहेत, तुम्हाला माहीत आहे. हा जनसागर पाहून त्यांच्या नाकाला मिरच्या झोंबत आहेत. त्यामुळे चिंतन करा आणि तांदळासारख्या दिसणाऱ्या गारांना बाजूला काढा.
मुश्रीफांच्या आकांक्षा पूर्ण होऊ दे
By admin | Published: September 24, 2014 12:23 AM