कोल्हापूर : जैवविविधता आणि झाडांचे संवर्धन करुन शहर स्वछ, सुंदर आणि हरित करुया. यासाठी लोकसहभाग आणि गार्डन्स क्लबच्या माध्यमातून प्रयत्नांची गरज आहे, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी शनिवारी येथे केले.महाविर उद्यान येथे गार्डन्स क्लब आणि कोल्हापूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ४९व्या पुष्पप्रदर्शनाचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. प्रमुख उपस्थिती महापौर अॅड. सुरमंजिरी लाटकर, नगरसेवक राहुल चव्हाण, उमा इंगळे, स्मिता कदम, गार्डन्स क्लबच्या अध्यक्ष कल्पना सावंत, उपाध्यक्ष शशिकांत कदम, सचिव पल्लवी कुलकर्णी, राज अथणे, प्रदूषण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी प्रशांत गायकवाड,‘आयआयआयडी’ चे अध्यक्ष संदीप घोरपडे आदी प्रमुख उपस्थिती होती.या प्रदर्शनात डेलिया, मिनिमेअर डेलिया,ग्लॅडिाओली, झिनियार, अस्टर, कर्दळ, जर्बेरा, झेंडू, सुर्यफूल, गुलाब, निशिगंध, डेझी, जास्वंद यासह विविध जातीच्या फुलांचा समावेश आहे. पहिल्या दिवशी हे प्रदर्शन पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. त्याचबरोबर पुष्परचेच्या विविध स्पर्धा घेण्यात आल्या.यावेळी ‘किंग आॅफ द शो’ अण्णाभाऊ साठे सूत गिरणी (आजरा) व ‘क्वीन आॅफ द शो’ संजय घोडवत ग्रुप (अतिग्रे)यांना प्रदान करण्यात आले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले. तसेच गार्डन्स क्लब च्या रोजेट या पुस्तकाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. जिल्हाधिकारी देसाई म्हणाले, जैवविविधतेने नटलेल्या कोल्हापूरात झाडांचे आणखी संवर्धन करुया. त्यामुळे कोल्हापूरकडे पर्यटकांची रीघ लागेल.डॉ. कलशेट्टी म्हणाले, पुष्पप्रदर्शन हे फक्त महावीर उद्यानापुरते न राहता शहरातील प्रत्येक उद्यानात भरवले पाहिजे. तरच लोकांना पर्यावरणाचे महत्त्व समजेल. कल्पना सावंत म्हणाल्या, तीन दिवस हे प्रदर्शन सुरु राहणार असून यामध्ये पर्यावरण विषयक कार्यशाळा, प्रात्यक्षिके, घरगुती बाग-बगीचा, किचन कंपोस्ट, पर्यावरणपूरक निवारा, विविध स्पर्धा, सजावट स्पर्धा अशा विविध विषयांवर तज्ञांचे मार्गदर्शनपर व्याख्यान होणार आहे.
प्रदर्शनात विविध कार्यक्रमप्रदर्शनात लहान मुले व जेष्ठांसाठी चित्रकला स्पर्धा, पर्यावरण विषयक लघुपट स्पर्धा, बोटानिक फॅशन शो असे कार्यक्रम होणार आहेत. स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा सोमवरी सायंकाळी ६ वाजता प्रमुख पाहुण्या शांतीदेवी.डी. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत होईल.