कोल्हापूर : आपल्यातील वाईट प्रवृत्तींचा नाश करून चांगल्याचा स्वीकार करण्याचा संदेश देणारी होळी उद्या, बुधवारी सर्वत्र साजरी होत आहे. पर्यावरणप्रेमी नागरिकांनी हा सण निसर्गाचा ऱ्हास न करता होळी लहान करूया, पोळी दान करूया अशी हाक दिली आहे.होलिका दहन या पारंपारिक कथेशी जोडलेल्या या सणाला घराघरांत पुरणपोळी बनवली जाते. दुपारी अथवा सायंकाळी दारात शेणी लावून होळी पेटवली जाते. त्याभोवतीने लहान मुले टिमक्या वाजवत गोल फिरतात. होळीपासून खऱ्या अर्थाने उन्हाळ्याला सुरुवात होते, असे म्हणतात. मात्र, या निमित्ताने पुरणपोळीसारखे सुग्रास जेवण होळीत घातले जाते.
मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होते, एरंडेल या औषधी वनस्पतीला आगीच्या भक्ष्यस्थानी घातले जाते शिवाय शेणी, लाकूड अशा नैसर्गिक साधनसंपत्तीचाही मोठ्या प्रमाणात ऱ्हास होतो. त्याचा निसर्गावर आणि पर्यावरणावर होत असलेला परिणाम लक्षात घेऊन गेल्या काही वर्षांपासून पर्यावरणप्रेमी नागरिक व संस्थांनी पर्यावरणपूरक होळीचे आवाहन केले आहे.महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने होळी लहान करूया, पोळी दान करूयाची हाक देण्यात आली आहे. पुरणाची पोळी आगीत अर्पण करण्याऐवजी एखाद्या गरजूला द्या म्हणजे त्याच्या भूकेची आग शांत हेईल. होळीत शेणीऐवजी वाळलेला कचरा जाळा असे आवाहन करण्यात आले आहे.
स्मशानभूमीला लाखो शेणीपर्यावरणपूरक होळी या आवाहनाला नागरिकांचाही आता सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. यादिवशी अनेक तालीम मंडळे व संस्थांच्यावतीने पंचगंगा स्मशानभूमीला शेणी दान केल्या जातात. लाखोच्या संख्येने जमा होणाऱ्या या शेणीमुळे पुढील काही महिने शेणीची कमतरता भासत नाही. फुलेवाडी येथील मानसिंग पाटील युवा मंचच्यावतीने स्मशानभूमीसाठी ५१ हजार शेणीदान करण्यात येणार आहेत.टिमक्यांची खरेदीया सणाला टिमक्यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. चामड्यापासून बनवल्या जाणाऱ्या या टिमक्यांची जागा आता प्लास्टिकच्या टिमक्यांनी व ताशाने घेतली आहे. आकर्षक रंगातील या टिमक्या व ताशा ४० रुपयांपासून अगदी शंभर दोनशे रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. शहरातील मिरजकर तिकटी, पापाची तिकटी, महापालिका परिसरात मांडलेल्या या टिमक्यांनी होळीची चाहूल दिली आहे.