कोल्हापूर : भूविकास बँक सेवानिवृत्त कर्मचारी यांना अनेक वर्षांपासून थकीत रक्कम बँकेकडून मिळालेली नाही, या देणीबाबतचा प्रशासनातील संबंधित अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून सकारात्मक निर्णय घेऊ व हा प्रश्न लवकरच मार्गस्थ लावू, असे आश्वासन कामगार राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सेवानिवृत्त कर्मचाºयांच्या शिष्टमंडळास दिले.भूविकास बँकेतील सेवानिवृत्त कर्मचाºयांच्या थकीत रकमेबाबत विधानभवन येथे मंत्री बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली बैठकीचे आयोजन केले होते. बैठकीत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या वतीने अमरावतीचे प्रतिनिधी संदीप भांडवलकर यांच्याकडून मंत्री बच्चू कडू यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर कोल्हापूरचे संजय साळोखे यांनी मागण्यांचे निवेदन दिले.
यानंतर भूविकास बँकेच्या प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. राज्यातील भूविकास बँक सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची अवस्था दयनीय झाली असून, अनेक आर्थिक अडचणी येत आहेत, काही कर्मचारी मृत झाले असून, त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे; त्यामुळे राज्यातील बँकांची मालमत्ता १००० कोटी पेक्षा जास्त आहे. कर्मचाऱ्यांची देणी ३०० कोटींपर्यंत आहेत. शासनाने बँकेची मालमत्ता ताब्यात घेऊन राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांची देणी भागवावीत, असे सांगितले.कर्मचाºयांचे प्रश्न ऐकून घेऊन प्रशासनातील संबंधित अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून सकारात्मक निर्णय घेण्याच्या अनुषंगाने मंत्रालयात अधिकारी व बँक प्रतिनिधी यांची मिटिंग घेण्याबाबत आश्वासन दिले.बैठकीस, कोल्हापूर प्रतिनिधी शामराव भावके, संजय साळोखे, बाबूराव हनगंडे तसेच संदीप भांडवलकर (वर्धा), संजीवन पाटील (ठाणा), भगवंत इंगळे (बुलढाना), विठ्ठल जवंदाळ (परभणी), दिलीप अंधारे (सोलापूर), तसेच इतर जिल्हा प्रतिनिधी उपस्थित होते.