कोल्हापूर : विविध स्वरूपातील अशैक्षणिक कामे, प्रशिक्षण आणि उपक्रमांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे आमची आणि विद्यार्थ्यांची भेट होणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे अशैक्षणिक कामे कमी करा, आम्हाला शाळेत शिकवू द्या, अशी मागणी कोल्हापुरातील प्राथमिक शिक्षकांनी जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेचे (डाएट) प्राचार्य आय. सी. शेख यांच्याकडे सोमवारी केली. ही मागणी गांभीर्याने घेऊन त्याबाबत सकारात्मक कार्यवाही करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या शिक्षकांनी यावेळी दिला.कोल्हापूर महानगरपालिका सर्व प्राथमिक शिक्षक संघटना कृती समितीच्या नेतृत्वाखाली प्राथमिक शिक्षक-शिक्षिका ‘डाएट’ येथे सोमवारी सायंकाळी दाखल झाल्या. येथील सभागृहात झालेल्या बैठकीत त्यांनी आपल्या मागण्या, भूमिका आणि भावना मांडल्या.
प्रारंभी कृती समितीच्या शिष्टमंडळाने प्राचार्य शेख यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. खासगी प्राथमिक महासंघाचे विभागीय अध्यक्ष राजेंद्र कोरे म्हणाले, जिल्ह्यातील शैक्षणिक गुणवत्ता वाढवायची असेल, तर अनावश्यक अशैक्षणिक कामे बंद व्हावीत. राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे प्रमुख सुधाकर सावंत म्हणाले, शासन आणि शिक्षण विभागाकडून केवळ कागद रंगविण्यासाठीचे उपक्रम, प्रशिक्षण बंद व्हावीत. त्यांचे प्रमाण वाढत असल्याने आणि ताळमेळ नसल्याने आमची आणि विद्यार्थ्यांची भेट होत नसल्याचे वास्तव आहे. आम्हाला शाळेत शिकवू द्या.
खासगी प्राथमिक शिक्षक-सेवक समितीचे राज्याध्यक्ष भरत रसाळे म्हणाले, शिक्षकांचा संताप, असंतोष समजून आमच्या मागण्यांबाबत कार्यवाही करावी, अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल. राज्य मान्य खासगी प्राथमिक शिक्षक महासंघाचे राज्य उपाध्यक्ष संतोष आयरे म्हणाले, शासनाकडून आलेल्या प्रशिक्षण व्यतिरिक्त अन्य कोणत्याही प्रकारची प्रशिक्षण मागणी केल्याशिवाय देऊ नयेत. सुशील जाधव म्हणाले, विविध स्वरूपांतील ८२ अशैक्षणिक कामे शिक्षकांना करावी लागत आहेत. त्याचा परिणाम शिक्षणाच्या दर्जावर होत आहे. ते लक्षात घेऊन शासनाने अशैक्षणिक कामे कमी करावीत.
प्राचार्य शेख म्हणाले, शासकीय प्रशिक्षणे दिली जातील. उपक्रमांचे आयोजन केले जाईल. अन्य प्रशिक्षण, उपक्रम घेतले जाणार नाहीत. गुणवत्तावाढीसाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया. महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाचे प्रशासनाधिकारी एस. के. यादव म्हणाले, मागण्यांबाबत कृती समितीच्या शिष्टमंडळासमवेत पुढील आठवड्यात बैठक घेऊन चर्चा केली जाईल. या बैठकीस सुनील गणबावले, उमेश देसाई, मनोहर सरगर, संजय पाटील, विलास पिंगळे, अनिल सरक, सचिन शेवडे, दस्तगीर मुजावर, आदी उपस्थित होते.
मागण्या अशा
- शासनाच्या शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रमांव्यतिरिक्त अन्य कोणताही उपक्रम राबवू नये.
- समृद्धी पर्व उपक्रमाची सक्ती करू नये.
- स्वयंसेवी संस्था, विविध ट्रस्ट यांच्या उपक्रमासाठी शिक्षकांना वेठीस धरू नये.
- शासनाकडून आलेल्या प्रशिक्षणासाठी वेळेवर नियोजन कळवावे.