कोल्हापूर : शहरात सुरू असलेला गणेशोत्सव आनंदमय व पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा व्हावा. या उद्देशाने शुक्रवारी सकाळी कोल्हापूर महानगरपालिका व एकटी संस्था, कॉमर्स कॉलेज, न्यू कॉलेज, महावीर महाविद्यालय, आदींच्या वतीने शुक्रवारी सकाळी शहरातील प्रमुख मार्गांवरून प्रबोधन फेरी काढण्यात आली. या फेरीचे उद्घाटन दसरा चौक येथून महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते झाले.या प्रबोधन फेरीत विद्यार्थ्यांनी ‘गणपती बाप्पा मोरया, आम्हाला नदी स्वच्छ ठेवण्याची बुद्धी द्या’, निर्माल्याचे खत करूया, मूर्ती पर्यावरणपूरक विसर्जित करूया’ नदी तलावांचा ठेवूया मान, विसर्जित मूर्ती करूया दान ’ अशा विविध घोषणांनी फेरी मार्ग दणाणून सोडला. दसरा चौक येथून निघालेली ही फेरी बिंदू चौक, शिवाजी पुतळा यामार्गे महापालिका मुख्य इमारत चौकाजवळ विसर्जित करण्यात आली.
यानिमित्त बोलताना आयुक्त डॉ. कलशेट्टी म्हणाले, शनिवारी घरगुती गणेशमूर्ती विसर्जन होणार आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी महापालिकेसह सर्व स्वयंसेवी संस्था सहभागी होत आहेत; त्यामुळे सर्वांनी मिळून १०० टक्के गणेशमूर्ती अर्पण व फेर विसर्जन करून उत्सवाचा आनंद घेऊया, असे आवाहन केले.यावेळी पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्रांबरे, मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार, आरोग्य निरीक्षक राहुल राजगोळकर, दिलीप देसाई, उज्ज्वल नागेशकर, पंचगंगा घाट संवर्धन समितीचे प्रमोद पुंगावकर, ‘अवनि’च्या अनुराधा भोसले, ‘एकटी’ संस्था, वसुधा कचरावेचक संघटना, छत्रपती शाहू कॅन्सर रिसर्च फौंडेशन, कॉमर्स कॉलेज, न्यू कॉलेज, महावीर कॉलेज विद्यार्थी, विद्यार्थिनी, आदी उपस्थित होते.