लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : ‘गोकूळ’च्या निवडणुकीत विरोधी राजर्षी शाहू शेतकरी आघाडीला प्रत्येक तालुक्यातून चांगला प्रतिसाद मिळत असून गोरगरीब दूध उत्पादकाच्या कल्याणासाठी आघाडीला विजयी करून जोतिबाचा गुलाल उधळूया, असे आवाहन आमदार विनय कोरे यांनी केले.
पन्हाळा तालुक्यातील ठरावधारकांच्या मेळाव्या ते बोलत होते. आमदार कोरे म्हणाले, ‘गोकूळ’मध्ये परिवर्तनाची लढाई गेली अनेक वर्षे करत आहे. हा दूध संघ दूध उत्पादकांच्या मालकीचा राहावा, यासाठी आमचा प्रयत्न असून या निवडणुकीत ‘गोकूळ’मध्ये परिवर्तन निश्चित आहे.
पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, पन्हाळा तालुक्यातील ठरावधारकांनी राजर्षी शाहू आघाडीला पॅनेल टू पॅनेल मतदान करून ‘गोकूळ’ मधून महाडिक प्रवृत्तीला हद्दपार करावे. ‘गोकूळ’सारखी शिखर संस्था टिकली पाहिजे, यासाठी आम्ही गेली आठ-दहा वर्षे संघर्ष करत आहोत. दूध उत्पादकांच्या मालकीचा संघ व्हावा, यासाठी लढा उभारला. त्यामध्ये यश आल्यानेच मल्टीस्टेट थांबले आणि आज संघाच्या खऱ्या मालकांना मतदानाचा हक्क मिळाला. शेतकऱ्यांना दोन रुपये जादा दर देण्याच्या उद्देशाने आम्ही निवडणुकीत उतरलो आहे; मात्र सत्ताधारी मंडळींना संघ आपल्या एकट्याच्या मालकीचा करायचा आहे. हे षडयंत्र आम्ही हाणून पाडले. सभासदांनी मताच्या रूपाने या प्रवृत्तीला अद्दल घडवावी.
माजी आमदार चंद्रदीप नरके म्हणाले, विरोधी आघाडी गेली पाच वर्षे दूध उत्पादकांच्या न्याय हक्कासाठी सातत्याने लढत आहे. दुधाला चांगला दर मिळावा, यासाठी आम्ही लढलो, शेतकऱ्यांच्या मालकीचा संघ राहावा यासाठी संघर्ष केला. खासदार संजय मंडलीक, आमदार राजेश पाटील, जिल्हा बँकेचे संचालक बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर आदी उपस्थित होते. प्राचार्य महादेव नरके यानी उमेदवारांचा परिचय करून दिला. अजित नरके यांनी आभार मानले.
फोटो ओळी :‘गोकूळ’ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पन्हाळा तालुक्यातील ठरावधारकांच्या मेळाव्यात आमदार विनय कोरे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी अरुण डोंगळे, विश्वास पाटील, पालकमंत्री सतेज पाटील, चंद्रदीप नरके, संजय मंडलीक, राजेश पाटील, अमरसिंह पाटील, सुजीत मिणचेकर, बाबासाहेब पाटील आदी उपस्थित हाेते. (फाेटो-२७०४२०२१-कोल-गोकूळ काेरे मेळावा)