लोकमत न्यूज नेटवर्क -कोल्हापूर : आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कोल्हापूर विभागीय केंद्र पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होणार आहे, असे नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी सांगितले.विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या कोल्हापूर विभागातील महाविद्यालयांचे अधिष्ठाता, प्राचार्य यांच्यासमवेत आयोजित बैठकीत ते बोलत होते. कोल्हापुरातील एसजीपीईएस होमिओपॅथिक महाविद्यालय व रुग्णालयात बैठक झाली. कुलगुरू डॉ. म्हैसेकर म्हणाले, विद्यापीठाची मुंबई, पुणे, नागपूर आणि औरंगाबाद येथील विभागीय केंद्रे पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाली आहेत. आता कोल्हापुरातील केंद्र कार्यान्वित केले जाईल. या केंद्राच्या जागेसाठीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर झाला आहे. बैठकीच्या प्रारंभी पंचाचार्य होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालयातर्फे प्राचार्य डॉ. राजकुमार पाटील यांनी कुलगुरू डॉ. म्हैसेकर यांचा सत्कार केला. यावेळी विद्यापीठाचे उपकुलसचिव डॉ. उदय रावराणे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. बी. वाय. माळी, इस्लामपूर वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. वृषाली वाटवे, वारणा दंत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हरीश कुलकर्णी, सांगली होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र मेथे, साताऱ्यातील आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विलास जगताप, गडहिंग्लज आयुर्वेद महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. वीणा कंठी, आदी उपस्थित होते.बृहत आराखडा, परीक्षा पद्धतीबाबत मार्गदर्शनया बैठकीत विद्यापीठाचा बृहत आराखडा, शिक्षकमान्यता प्रस्ताव, परीक्षा पद्धतीमधील बदल, विद्यार्थी व प्राध्यापकांचे शोधनिबंध, प्राध्यापकांची वेतनश्रेणी, संशोधन केंद्र, नवीन महाविद्यालयांच्या मान्यतेचे प्रस्ताव, आदींबाबत कुलगुरू डॉ. म्हैसेकर यांनी मार्गदर्शन केले.
आरोग्य विद्यापीठाचे कोल्हापूर केंद्र क्षमतेचे करू
By admin | Published: May 17, 2017 1:15 AM