लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोरोनाबाधितांची मृत्यूसंख्या वाढत असल्याने त्यांच्यावर कराव्या लागणाऱ्या अंत्यविधीसाठी शेणी व लाकूड भविष्यात कमी पडू नये म्हणून स्मशानभूमीस शेणी दान करण्याचे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे. मुख्यत: यात ग्रामीण भागातील लोकांनी जास्त मदत करण्याची गरज आहे.
पंचगंगा स्मशानभूमी, बापट कॅम्प, कसबा बावडा तसेच कदमवाडी येथे मृतदेहांवर महापालिकेच्यावतीने मोफत अंत्यविधी करण्यात येतो. सध्या कोविडचा प्रार्दुभाव वाढल्याने मृत्यूंच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. सध्या महानगरपालिकेकडे पुरेशा प्रमाणात शेणी, लाकूड व गॅस सिलिंडर उपलब्ध आहे. लाकूड व शेणी खरेदीची प्रक्रिया राबविण्यात आलेली आहे; परंतु पुढील काही महिने मृत्यूची संख्या वाढत राहिल्यास अंत्यविधींसाठी पुरेशा प्रमाणात लाकूड व शेणी मुबलक उपलब्ध असणे आवश्यक आहे. शहरातील सर्व सेवाभावी संस्था, तरुण मंडळे, तालीम मंडळे, दानशूर व्यक्ती व नागरिकांनी मागील वर्षीप्रमाणे याहीवर्षी स्मशानभूमीस शेणीदान करून महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
गेल्यावर्षी शेणी कमी पडल्याचे लक्षात आल्यावर ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने लोकांनी शेणीदान केल्या होत्या. तशीच मोहीम यंदाही सुरू होण्याची गरज आहे. पंचगंगा स्मशानभूमीत कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील मृतांवरही मोठ्या प्रमाणात मोफत अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. त्यामुळे त्याची उतराई करण्याची वेळ आता ग्रामीण भागावर आहे. प्रत्येक गावाने घरोघरी पाच शेणी गोळा करून एक ट्रॉली जरी आणून दिली तरी महापालिकेला शेणी व लाकडाची टंचाई जाणवणार नाही. कोल्हापुरात काही कमी पडू लागले असे समजल्यावर लोक मदतीसाठी धावून येतात.. तशीच मोहीम आता सुरू होण्याची गरज आहे.