कोल्हापूरकरांनो हात जोडतो, हद्दवाढ करूया; उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केली विनवणी 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2023 11:45 AM2023-09-11T11:45:22+5:302023-09-11T12:03:26+5:30

स्मार्ट सिटीच्या धर्तीवर निधी देऊ

Let's expand Kolhapur, Deputy Chief Minister Ajit Pawar made a plea | कोल्हापूरकरांनो हात जोडतो, हद्दवाढ करूया; उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केली विनवणी 

कोल्हापूरकरांनो हात जोडतो, हद्दवाढ करूया; उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केली विनवणी 

googlenewsNext

कोल्हापूर : ‘कोल्हापूरकरांनो, मी तुमच्यासमोर हात जोडतो, कोणतेही राजकारण न करता हद्दवाढीसाठी एकोपा करा. हद्दवाढीचा निर्णय घेण्यासाठी मला मदत करा,’ अशी विनवणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी येथे झालेल्या जाहीर सभेत केली. जर तुम्ही मला हद्दवाढीचा निर्णय घेण्यासाठी मदत केली तर स्मार्ट सिटीला दिला जातो, तसा निधी मिळवून देण्यात मी कमी पडणार नाही,’ अशी ग्वाहीसुद्धा पवार यांनी दिली.

कोल्हापूर जिल्हा व शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने येथील तपोवन मैदानावर आयोजित केलेल्या उत्तरदायित्व सभेत उपमुख्यमंत्री पवार यांनी कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीसह विविध प्रश्नांचा उल्लेख करत कोल्हापूरच्या विकासकामात भरीव मदत करण्याची भूमिका जाहीर केली.

टोलचे आंदोलन करून कोल्हापूरकरांनी राज्य सरकारला वाकविले होते. त्या वेळी दाखविलेला एकोपा आता हद्दवाढीच्या विषयातही दाखवा, असे आवाहन करून पवार म्हणाले, आज राज्याची तिजोरी माझ्या ताब्यात आहे. कोल्हापूरच्या पुढील पन्नास वर्षांचा विचार करून शहराजवळची गावे ही शहरात आली पाहिजे. याबाबत तातडीने निर्णय घेतला नाही तर शहर भकास होईल. काही गोष्टी ज्या त्या वेळी कराव्या लागतात.

पुण्यातील धनकवडीसारखा भाग शहरात घ्यायला उशीर झाला. त्यामुळे तेथे कसलेही प्लॅनिंग नाही. सुविधा नाहीत. विकासात मागे राहिले आहे. म्हणूनच मी सांगतोय कोल्हापूरकरांनो, राजकारण न आणता एकोपा करा. लोकांना समजावून सांगा. कोल्हापूरची हद्दवाढ झाली तर निधी देण्यात कमी पडणार नाही.

पंचगंगा प्रदूषण दूर करण्यात पुढाकार घ्या

पंचगंगा नदी प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित करून उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त करायची असेल तर प्रथम नदीकाठावरील गावे स्वच्छ करायला पाहिजेत. प्रदूषण कमी करण्यास राज्य सरकार तयार आहे. केंद्र सरकारकडेही निधी मागण्यास तयारी आहे. मात्र नदीकाठच्या गावातील ग्रामस्थांनीही यात पुढाकार घेतला पाहिजे. अंबाबाई मंदिराच्या २५० कोटींच्या विकास आराखड्यास देखील मदत केली जाईल.

काळम्मावाडी धरण दुरुस्तीला ८० कोटी

काळम्मावाडी धरणगळती दूर करण्याच्या अनुषंगाने मागच्या आठवड्यात मंत्रालयात बैठक झाली. गळती काढण्यासाठी ८० काेटींचा निधी लागणार आहे. हा निधी ३१ मार्च २०२४ पर्यंत खर्च करत असाल तर हा निधी उपलब्ध करून देऊ आणि जर तेवढा खर्च होणार नसेल तर ४० कोटींचा निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे अधिकाऱ्यांना सांगितल्याचे पवार म्हणाले.

धामणी धरणासही मदत

धामणी धरणाचे पाणी अडविण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यासाठीही मदत करण्याची राज्य सरकारचीही तयारी असल्याचे पवार यांनी सांगितले. केएमटीला उभारी देण्याच्या अनुषंगाने येथील प्रशासन, लोकप्रतिनिधींनी योग्य प्रस्ताव दिला तर मदत करू, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

यूपीएससी प्रशिक्षण केंद्र उभारणार

कोल्हापूर शहरात सारथीच्या माध्यमातून यूपीएससी प्रशिक्षण केंद्र तसेच ५०० मुली व ५०० मुलांचे वसतिगृह उभारण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्यासाठी १८० कोटींचा निधी लागणार असून, तो देण्याची आमची तयारी असल्याचे पवार यांनी सांगितले.

शेतकऱ्यांना ५० हजार प्रोत्साहन अनुदान

आम्ही दोन लाखांची कर्जमाफी जाहीर केली. ज्यांनी प्रामाणिक परतफेड केली त्यांनाही ५० हजारांचे प्रोत्साहन अनुदान जाहीर केले. कोल्हापुरातील काही शेतकऱ्यांना याचा लाभ झालेला नाही याची माहिती मिळाली. अपात्र ठरविलेल्या शेतकऱ्यांना हे अनुदान देण्यास सहकारमंत्र्यांना सांगतो. मुश्रीफ साहेब तुम्ही फक्त ‘डीडीआर’ना सांगून याबाबत यादी व प्रस्ताव तातडीने देण्यास सांगा, असे पवार म्हणाले.

शिवाजी विद्यापीठाला निधी देणार

शिवाजी विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सवादरम्यान विद्यापीठास ५० कोटींचा निधी जाहीर केला होता. त्यातील काही निधी मिळाला. बाकीचा निधी मिळायचा राहिला आहे. हा निधी ३१ मार्च २०२४ पूर्वी वितरीत केला जाईल, अशी ग्वाही पवार यांनी दिली.

‘आयटी’ क्षेत्राबाबत निर्णय घेणार

कोल्हापूरला आयटी क्षेत्राचा विकास व्हायला पाहिजे अशी मागणी आहे. तसा प्रयत्न केला तर येथे आयटी कंपन्या येतील, युवकांना रोजगार मिळेल. पुणे, बंगळुरू, हैदराबादमध्ये ज्या पद्धतीने हे क्षेत्र विस्तारले त्याच पद्धतीने कोल्हापुरातही प्रयत्न करावे लागतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मी एकत्र बसून याविषयी निर्णय घेऊ, असे पवार यांनी सांगितले.

जिल्हा नियोजनमधून तालमींना निधी

राजर्षी शाहू महाराजांनी १९१२ साली खासबाग कुस्ती मैदान बांधले. त्यात सादीक पंजाबी, हरिश्चंद्र बिराजदार, दीनानाथसिंह आदी दिग्गज मल्लांनी मैदान गाजविले. हे मल्ल गंगावेश तालीम, शाहूपुरी तालीम, मोतीबाग तालीम आदी तालमीत सराव करीत होते. आज या तालमींच्या नूतनीकरणाची गरज आहे. तरच पुढेही याच मातीतून अनेक मल्ल घडतील. जिल्हा नियोजन निधीतून या तालमींच्या नूतनीकरणासाठी निधी उपलब्ध होत नव्हता. आता मी स्वत: यात पुढाकार घेऊन मुंबईत सोमवारी गेल्यानंतर आदेश काढतो. यापुढे तालमींच्या विकासासाठी निधी उपलब्ध केला जाईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
 

Web Title: Let's expand Kolhapur, Deputy Chief Minister Ajit Pawar made a plea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.