कोल्हापूर : मराठा आरक्षणासाठी सरकारवर दबाव निर्माण करणारे आंदोलन करूया. दिल्लीपर्यंत धडक देऊया. कोरोनाच्या वाढत्या काळात लोकांचा जीव धोक्यात घालणारे आंदोलन नको. आरक्षणासाठी योग्य नियोजनाने आरपारची लढाई करूया, अशा विविध सूचना कोल्हापुरातील मराठा समाजातील समन्वयकांनी गुरुवारी केल्या.
येथील शासकीय विश्रामगृहातील राजर्षी शाहू सभागृहात खासदार संभाजीराजे यांनी दि. १६ जून रोजी आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी या समन्वयकांची मते, सूचना जाणून घेतल्या. या समन्वयकांनी खासदार संभाजीराजे यांच्या आंदोलनाच्या भूमिकेला पाठिंबा दिला. कोल्हापुरातील मराठा समाजाचे अनेक नेते शिरोली नाक्यापुढे येत नसल्याचे वास्तव आहे. त्यांनी ही भूमिका बदलावी. मराठा समाजातील असंतोष राज्य सरकारला दाखवून देऊया. इंदिरा सहानी खटल्याची तंतोतंत अंमलबजावणीची मागणी केली पाहिजे, असे प्रा. जयंत पाटील यांनी सांगितले. आपण कुठे कमी पडतोय त्याचा अभ्यास करूया. योग्य नियोजनाने आरक्षणासाठी आरपारची लढाई करूया, असे बाबा इंदुलकर यांनी सांगितले. कोरोना वाढत असल्याने लोकांचा जीव धोक्यात आहे. त्यामुळे दि. १६ जूनचा मोर्चा स्थगित करूया. आमदार, खासदार काय करणार हे जाणून घेऊन मगच मोर्चा काढूया, असे अजित राऊत यांनी सांगितले. विशेष अधिवेशनाची आपली मागणी सरकारने नाकारली आहे. त्यामुळे आंदोलन हे करावेच लागेल. कोरोनाची स्थिती पाहता समाज जगला, तरच आरक्षणाचा उपयोग होईल, असे दिलीप देसाई यांनी सांगितले. आर. के. पोवार, दिलीप पाटील, सचिन तोडकर, दिलीप सावंत, सुनीता पाटील, चंद्रकांत पाटील, बाळ घाटगे, सुजित चव्हाण, आदी सूचना मांडल्या. यावेळी जयेश कदम, इंद्रजित सावंत, हर्षल सुर्वे, रविराज निंबाळकर, किशोर घाटगे, रमेश पोवार, रमेश कदम, दिगंबर फराकटे, सुशील भांदिगरे, कमलाकर जगदाळे, चंद्रकांत चिले, महादेव पाटील, अनिल घाडगे, संजय काटकर, विनायक फाळके, बाबा महाडिक, रमेश मोरे, भाऊ घोडके, निवासराव साळोखे, जयकुमार शिंदे, बाबा पार्टे, महेश जाधव, अशोक पोवार उपस्थित होते. फत्तेसिंह सावंत यांनी प्रास्ताविक केले.
कोण, काय म्हणाले?
राजू सावंत : राज्य सरकारवर दबाव निर्माण करण्यासाठी विविध टप्प्यांनी आंदोलन तीव्र करूया.
सुनीता पाटील : राज्यव्यापी आंदोलनासाठी एकच नियमावली करावी.
प्रसाद जाधव : कोरोनाच्या सद्य:स्थितीत थोडे थांबून पुढील दिशा ठरवावी. लोकप्रतिनिधींनी लढ्यात उतरावे.
रूपेश पाटील : मराठ्यांचा ओबीसीमध्ये समावेश करून आरक्षणाची मागणी करावी.