कोल्हापूर : संभाव्य पूरपरिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी सर्वांशी समन्वय ठेवून काम करा, अशा सूचना प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी गुरुवारी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
गेल्या दोन दिवसांपासून शहरात अतिवृष्टी होत असून संभाव्य पुराचा धोका विचारात घेऊन पूरबाधित क्षेत्रातील माजी सदस्यांची बैठक निवडणूक कार्यालय येथे आयोजित केली होती. यावेळी बैठकीस आमदार चंद्रकांत जाधव उपस्थित होते.
सन २०१९ मध्ये आलेल्या महापुराचा विचार करून पूरबाधित क्षेत्रामध्ये तातडीने लागणारी मदत सर्वांनी समन्वय ठेवून करू या. पूरपरिस्थितीमध्ये करावयाच्या कामाबाबत अधिकारी व कर्मचारी यांची जबाबदारी निश्चित केली आहे. चारही विभागीय कार्यालयांत सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली असल्याचे बलकवडे यांनी सांगितले.
माजी महापौर निलोफर आजरेकर यांनी पूरबाधित क्षेत्रामध्ये पाणी घरात येण्यापूर्वी नागरिकांना सक्तीने स्थलांतरित करा. यासाठी पोलिसांची मदत घ्यावी. पाणी आलेल्या ठिकाणी बॅरिकेड्स लावा. स्थानिक लोकप्रतिनिधींची व मंडळांची मदत घ्यावी. पूरपरिस्थितीत लोकांना पिण्याच्या पाण्याची टंचाई होऊ नये, यासाठी आताच नियोजन करा, अशा सूचना केल्या.
अतिवृष्टीमुळे उपनगरातही बऱ्याच ठिकाणी पाणी आले आहे. त्यामुळे नागरिकांचे आम्हाला फोन येत आहेत. या ठिकाणी पाणी काढण्यासाठी जेसीबी वेळेवर मिळत नाही. प्रत्येक वॉर्ड ऑफिसला चार जेसीबी द्या, अशी सूचना शारंगधर देशमुख, माजी गटनेता सत्यजित कदम यांनी केली.
जल अभियंता अजय साळुंखे यांनी पिण्याच्या पाणीपुरवठ्यासाठी टँकरचे नियोजन केले असून महापालिकेचे १५ टँकर व भाड्याने २५ टँकर टप्प्याटप्प्याने घेतले असल्याचे सांगितले.
यावेळी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उप-आयुक्त निखिल मोरे, रविकांत आडसुळे, आरोग्याधिकारी डॉ. प्रकाश पावरा, उपशहर रचनाकार रमेश मस्कर, माजी स्थायी समिती सभापती सचिन पाटील, माजी नगरसेवक राहुल चव्हाण, राजसिंह शेळके, अर्जुन माने, प्रतापसिंह जाधव, माजी नगरसेविका माधुरी लाड, कविता माने, आश्पाक आजरेकर, दिग्विजय मगदुम, वैभव माने, संजय लाड उपस्थित होते.