हुपरी(ता. हातकणंगले)येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला जिल्हा प्रशासनाकडून अत्यल्प लस पुरवठा होत आहे. आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात साठ हजार लोकसंख्या असून, आठवड्यातून केवळ शंभरभर लस मिळत आहेत. परिणामी या भागात नागरिकांमधून नाराजीचा सूर उमटत आहे. त्यामुळे आमदार राजूबाबा आवळे यांनी गुरुवारी दुपारी प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट देऊन लसीकरणाबाबत बैठक घेतली. या वेळी यळगूड, रांगोळी, जंगमवाडी, रेंदाळ, इंगळी, पट्टणकोडोली व तळंदगे आदी गावांतील नागरिकांनीही लसीकरण सुरळीतपणे होण्यासाठी जादा लस देण्याची मागणी आमदार आवळे यांच्याकडे केली. आमदार आवळे यांनी आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना दूरध्वनीवरून शहर व परिसरातील गावांतील लोकसंख्येच्या प्रमाणात लस पुरवठा करण्याची मागणी केली. त्यावेळी राज्यमंत्री पाटील-यड्रावकर यांनी हुपरी शहरासाठी व परिसरासाठी लससंख्या वाढवून देण्याचे आश्वासन दिले. या वेळी काॅंग्रेसचे शहराध्यक्ष लालासाहेब देसाई, उपाध्यक्ष बाबासाहेब गायकवाड, राजेश होगाडे, अनिल धोंगडे, कबीर आळतेकर, चंद्रकांत परकारे, संतोष कंगणे, चिदानंद खोत, विजय माने, प्रा. संभाजी बिंराजे, अमर कंगणे आदी उपस्थित होते.
फोटो : १० हुपरी आवळे : आमदार राजूबाबा आवळे यांनी गुरुवारी हुपरी (ता. हातकणंगले) प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट देऊन लसीकरणाबाबत बैठक घेतली. या वेळी दमयंती मोराळे, लालासाहेब देसाई, बाबासाहेब गायकवाड, राजेश होगाडे, अनिल धोंगडे, कबीर आळतेकर, चंद्रकांत परकारे, संतोष कंगणे आदी उपस्थित होते.