कोल्हापूर/सांगली : स्थानिक संस्था कर अर्थात एलबीटी हा कर विनापर्याय काढू, असे आश्वासन आज, मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील व्यापारी संघटनेची शिखर संस्था असलेल्या ‘फेडरेशन आॅफ असोसिएशन आॅफ महाराष्ट्र’(फाम) या संघटनेला दिले. आज, मंगळवारी मंत्रालयात फडणवीस व ‘फाम’चे अध्यक्ष मोहन गुरनानी यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. त्यासाठी राज्यातील सर्व महापालिकांच्या आयुक्तांची गुरुवारी (दि. २०) मंत्रालयात बैठक घेणार असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले राज्यात तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादी कॉँग्रेस आघाडी सरकारने महापालिका क्षेत्रात जकात बंद करून ‘एलबीटी’ हा कर आणला. या करातील जाचक अटींमुळे व्यापाऱ्यांनी याला विरोध केला आहे. मूल्यवर्धित कर (व्हॅट) यामध्ये एक ते दीड टक्का वाढ करावी, अशी व्यापाऱ्यांची मागणी आहे. मात्र, या सरकारने या प्रश्नाचे घोंगडे शेवटपर्यंत भिजत ठेवले. महिन्यापूर्वी राज्यात सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने विधानसभा निवडणुकीच्या काळात व्यापाऱ्यांना एलबीटी घालवू, असे आश्वासन दिले होते. त्यानुसार सत्ताधाऱ्यांच्या विरोधात भूमिका घेऊन व्यापाऱ्यांनी भाजपला मतदान केले.दरम्यान, आज, मंगळवारी मंत्रालयात सायंकाळी नूतन मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमवेत सायंकाळी पहिलीच बैठक झाली. सुमारे अर्धा तास ही बैठक झाली. यावेळी फडणवीस यांनी, एलबीटी काढण्यावर ठाम आहे. एलबीटी हटविण्यासाठी लागणारी माहिती घेतो. त्यासाठी गुरुवारी सर्व महापालिकेचे आयुक्त यांची बैठक घेतो. एलबीटी रद्द केल्यावर महापालिकेच्या उत्पन्नावर काय परिणाम होईल, कराची तूट कशी भरून काढायची याची चर्चा आयुक्तांसमवेत करणार आहे. आता येथून पुढे व्यापाऱ्यांकडून कोणताही प्रस्ताव घेणार नाही अथवा समिती नेमणार नाही. त्याचबरोबर व्यापाऱ्यांना महापालिका प्रशासनाने पाठविलेल्या नोटिसा मागे घेण्यासंदर्भात आयुक्तांना सांगू. या बैठकीत काय चर्चा होते ते पाहू, त्यानंतर पुढील आठवड्यात पुन्हा ‘फाम’च्या पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊ, असे आश्वासन यावेळी फडणवीस दिले.या बैठकीला ‘फॅम’चे अध्यक्ष मोहन गुरनानी, दीपेन अग्रवाल (नागपूर), पोपटलाल ओस्तवाल, वालचंद संचेती (पुणे) , राजीव राठी, प्रभाकर वणकुद्रे (सोलापूर), सदानंद कोरगावकर, प्रवीण शहा (कोल्हापूर), विराज कोकणे, आप्पा कोरे, धीरेन शहा, समीर शहा (सांगली) यांच्यासह २६ महापालिका क्षेत्रांतील व्यापारी प्रतिनिधी उपस्थित होते.
विनापर्याय ‘एलबीटी’ काढू : फडणवीस
By admin | Published: November 18, 2014 11:51 PM