वेगवेगळ्या कारणांनी मृत्यू होण्याचे प्रमाण पाहिले तर प्रश्न असा निर्माण होतो की, कोविडला घाबरायचे तरी कशाला..? कारण हा नवा विषाणू होता. आजही लस उपलब्ध नाही, निश्चित औषध उपलब्ध नाही. याचा संसर्ग पसरण्याची क्षमता खूप जास्त आहे. लॉकडाऊन केला नसता तर एक व्यक्ती महिन्याभरात ४०६ लोकांना संसर्ग देऊ शकतो. लॉकडाऊन ५० टक्के केला तर १५ आणि ७५ टक्के केला तर केवळ २.६ टक्के व्यक्ती बाधित होतात. आपली लोकसंख्या घनता, दारिद्र्य व सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचा अभाव यामुळे लॉकडाऊनचा कटू पर्याय शासनाला निवडावा लागला. जी चूक अनेक प्रगत देशांनी केली ती आपण केली नाही.
आता हा कोरोना कोठेही निघून गेलेला नाही, तो इथेच आहे. दीड महिन्यापूर्वी आपल्याला त्याच्याबद्दल माहिती कमी होती, लढाईसाठी साधने अपुरी होती, पण आता बरेच प्रबोधन झाले आहे. सर्वांना धोक्याची जाणीव करून दिली आहे. त्यामुळे प्रत्येकाने जबाबदारीने वागले पाहिजे. हे खूप कठीण आहे, पण त्याला दुसरा पर्याय दिसत नाही. जोपर्यंत शास्त्रज्ञ यावर लस अथवा औषध शोधत नाहीत तोपर्यंत आपल्याला कोरोनासह जगायचे आहे. त्यासाठी मास्क, हातांची स्वच्छता, परस्परांतील अंतर हे आपल्या सवयीचा भाग बनले पाहिजे. हे काही दडुंक्याच्या जोरावर बळजबरीने शिकवण्याची गोष्ट नाही, असे मला वाटते.आता या कोरोनामुळे निर्माण झालेले प्रचंड मोठे आर्थिक संकटही ‘जीवघेणे’ आहे. आपली पूर्ण अर्थव्यवस्था ही खुल्या आर्थिक धोरणांच्या निकषावर आधारलेली असल्याने ती लगेच ‘स्वयंपूर्ण खेडी’च्या पद्धतीवर परिवर्तीत होऊ शकत नाही. हे स्थित्यंतर केवळ वेदनादायी नाही तर जीवघेणे आहे. करोडो लोक बेरोजगार आणि लाखो लोकांची उपासमार होण्याचा धोका आहे. त्यामुळे सर्व प्रकारच्या मालाची वाहतूक चालू केली आहे. त्यामुळे जीवनावश्यक गोष्टींचा तुटवडा जाणवत नसून कृषी अर्थव्यवस्था बऱ्याच प्रमाणात रुळावर येण्यास प्रारंभ झाला आहे.
कोल्हापूर जिल्ह्याच्या सीमेवरील १९ तपासणी नाक्यांवरील आकडेवारीप्रमाणे एका दिवशी ५ मे रोजी ६९०० मालवाहतुकीच्या वाहनांनी प्रवेश केला. यापैकी ४०७८ वाहने कोल्हापूर जिल्ह्यात थांबणारी होती. याचा अर्थ सुमारे आठ हजार चालक आणि क्लीनर यांचा प्रवेश जिल्ह्यात झाला. तसेच ३४२ वाहने वेगवेगळ्या राज्य आणि महाराष्ट्रातील जिल्ह्यांतून परवाना घेऊन कोल्हापुरात आली. कोणी मृत, कोणी प्रसूतीसाठी, कोणी लहान मुलांना सोडण्यासाठी, घेऊन जाण्यासाठी, उपचारासाठी, शासकीय कर्तव्यावर हजर होण्यासाठी या कारणांसाठी हे परवाने त्या त्या जिल्ह्यांतून जिल्हाधिकारी अथवा पोलीस आयुक्त देतात. आलेल्या प्रत्येक व्यक्तीचे जिल्ह्याच्या सीमेवर तापमान तपासून, नोंद करून त्यांना
सरकारी रुग्णालयात पाठविले जाते. तेथे वैद्यकीय तपासणी करून आवश्यकता भासल्यास स्राव घेतला जातो, अन्यथा संस्थात्मक किंवा घरी विलगीकरण केले जाते. एखादी व्यक्ती रुग्णालयात पोहोचली की नाही हे पडताळले जाते.यामध्ये काही त्रुटी असल्या तरी त्या सुधारण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत, पण या सर्वांमध्ये हे लक्षात आले की, आपण एखाद्या बेटाप्रमाणे राहू शकत नाही. आपण काही स्वयंपूर्ण नाही अथवा होऊही शकत नाही. आपला शिरोळ तालुका सांगलीशी, सांगलीचा शिराळा तालुका शाहूवाडीशी, आपले चंदगड बेळगावशी एवढे जोडलेले आहे की, तेथे जिल्हा हा घटक लागू करताना अनेक व्यावहारिक अडचणी येतात. त्यामुळे आपल्याला काही धोके स्वीकारावे लागत आहेत.
अशा काळात आपले उद्दिष्ट कोरोनामुक्ती किंवा ग्रीन झोन न राहता, आपल्याला कोरोनामुळे कोणाचाही मृत्यू कसा होणार नाही, केसेसचे प्रमाण कमीत कमी राहील जेणेकरून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे रुग्ण सापडण्यापेक्षा जास्त राहील, आपली आरोग्य व्यवस्थाही कोलमडणार नाही, सामूहिक संसर्ग होणार नाही, आपली अर्थव्यवस्थाही रुळावर येण्यास प्रारंभ होईल, अशी असली पाहिजेत. आपण ग्रीन झोनमध्ये गेलो म्हणून आनंद साजरा करण्याची गरज नाही आणि मुंबईवरून आलेली व्यक्ती कोरोनाबाधित निघाली म्हणूनही आदळाआपट करून घेण्याची गरज नाही.
अनेक गावांमध्ये तर मुंबईहून आलेल्या व्यक्तीला अतिशय तिरस्काराची वागणूक मिळत आहे. शेवटी हा आपलाच देश आणि आपलाच महाराष्ट्र आहे. ही मुंबईही आमचीच आहे, तिला गुणदोषासह स्वीकारले पाहिजे. शास्त्रज्ञांना लस अथवा गुणकारी औषध मिळेपर्यंत आपल्याला कोरोनासह जगायचे आहे, आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग म्हणून स्वीकारायचे आहे. शेवटी ‘आरोग्य आणि अर्थव्यवस्था’ ही आपल्या गाडीची दोन चाके आहेत. दोघांचेही संतुलन ठेवत, नेहमीपेक्षा कमी वेगाने, अडखळत का होईना, मात्र जिद्दीने आणि कोरोनाला हरविण्याच्या निर्धारानेच आपण पुढे वाटचाल केली पाहिजे. या संकटातही निर्माण होणाऱ्या नव्या रोजगार व उद्योगाच्या संधी शोधल्या पाहिजेत.
डॉ. अभिनव देशमुख
पोलीस अधीक्षक, कोल्हापूर