कोल्हापूर/आजरा : राज्यात भाजप व शिंदे गटाचे सरकार आहे तोपर्यंत खासदार संजय मंडलिक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात, त्यानंतर ते आमच्यासोबत असतील असे सूचक विधान राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व माजी मंत्री जयंतराव पाटील यांनी केले. यावर खासदार संजय मंडलिक यांनी असे झाले तर आपण पहाटे पाच वाजता जाऊन राज्यपालांकडून शपथ घेऊ असे प्रत्त्युत्तर दिल्यामुळे व्यासपीठावर एकच हास्याचे फवारे उडाले.आजरा तालुक्यातील उचंगी प्रकल्पातील पाणी पूजन प्रसंगी दोन्ही नेते एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. खासदार संजय मंडलिक यांनी आपल्या मनोगतात उचंगीतील पाणीसाठ्याला कॉ. संजय तरडेकर यांचा संघर्ष, आमदार राजेश पाटील यांचा पाठपुरावा व हसन मुश्रीफ यांचे आशीर्वाद आहेत. पण सगळे प्रकल्प राष्ट्रवादीने नव्हे तर महाविकास आघाडी सरकारने निधी देवून पूर्ण केले आहेत असे सांगितले. यावर माजी जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांनी आपल्या भाषणात जिल्ह्यातील पाटबंधारे प्रकल्पांच्या पुर्ततेसाठी दोन-तीन वेळा खासदार मंडलिक माझ्याकडे आले होते. तर आमदार राजेश पाटील यांनी उचंगीच्या पूर्ततेसाठी सातत्याने पाठपुरावा केला. प्रकल्पांच्या पूर्ततेसाठी दोन्ही पाहुण्यांनी प्रयत्न केले आहेत. त्यामुळे खासदार मंडलिक राज्यात आताचे सरकार आहे तोपर्यंत शिंदे गटात राहतील त्यानंतर ते आमच्या सोबत असतील असे जयंतराव पाटील यांनी सांगताच राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या व कार्यकर्त्यांच्या भुवया उंचावल्या व हास्यकल्लोळाला सुरूवात झाली. यावेळी व्यासपीठावरील खासदार मंडलिक यांनीही याला लगेच प्रत्युत्तर देत असे झाले तर आपण पाच वाजता जाऊन राज्यपालांकडे शपथ घेऊ असे सांगितले. त्यामुळे व्यासपीठावर व सभास्थळी हास्याचे फवारे उडाले. प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनीच खासदार मंडलिक यांच्या बद्दल या प्रकारे विधान केल्याने राष्ट्रवादीसह शिंदे गटांच्या कार्यकर्त्यात चर्चेला उधाण आले आहे. यावेळी माजी मंत्री हसन मुश्रीफ, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, तालुकाध्यक्ष मुकुंद देसाई, अभिजीत डोंगळे, भिकू गावडे, बाबासाहेब पाटील, गंगाधर व्हसकोटी, सुधीर देसाई, संतोष पाटील, जयसिंग चव्हाण, अभय देसाई, जनार्दन बामणे, अल्बर्ट डिसोझा, सुरेश कुराडे, जयवंत शिंपी, अभिषेक शिंपी, आप्पासाहेब गडकरी उपस्थित होते.
'मग आपण पहाटे जाऊन शपथ घेऊ', पाटील-मंडलिकांची रंगली कोपरखळी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2022 9:07 PM