कोल्हापूर : सारथीच्या अन्य मागण्यांविषयी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत लवकरच बैठक घेऊ, अशी ग्वाही ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. सकल मराठा समाजाच्या वतीने रविवारी त्यांची भेट घेतली. यावेळी ते बोलत होते.
सकल मराठा समाजाने गेल्या नऊ महिन्यांत ह्यसारथीह्णचे कामकाज ठप्प असल्याने स्वायत्तता पूर्ववत ठेवावी व इतर मागण्यांसाठी निवेदने दिली तसेच आंदोलने केली होती. नुकत्याच शाहू छत्रपती यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या व्यापक बैठकीत पुणे येथे लालमहालावर आंदोलन जाहीर केले होते.
याची दखल घेऊन राज्य शासनाने सारथीला स्वायत्तता देण्याचा आदेश दिल्याबद्दल मंत्री मुश्रीफ यांची भेट घेऊन सकल मराठा समाजाने त्यांचे आभार मानले. यावेळी सारथीसह मराठा आरक्षण सोडवणुकीच्या दृष्टीने प्रयत्न व्हावेत, याविषयी चर्चा झाली. सकल मराठा समाजाचे वसंतराव मुळीक, इंद्रजित सावंत, दिलीप देसाई, ॲड. गुलाबराव घोरपडे, संदीप देसाई, प्रताप ऊर्फ भैय्या माने, प्रकाश गाडेकर, दिलीप सावंत, मयूर पाटील, अवधूत पाटील, आदी उपस्थित होते.