हेरले : हेरले येथील कोविड सेंटरसाठी लागेल ती मदत करण्याचे आश्वासन आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिले. हेरले (ता. हातकणंगले) येथील प्राथमिक शाळेत सुरू असलेल्या कोविड केअर सेंटरला शनिवारी त्यांनी सदिच्छा भेट दिली, त्यावेळी ते बोलत होते.
ते म्हणाले, गावातील वाढती कोरोनाबाधितांची संख्या पाहता सुरू करण्यात आलेल्या कोविड सेंटरमुळे अनेकांना दिलासा मिळाला आहे. ग्रामपंचायत, विविध संघटना व युवकांनी केलेले काम कौतुकास्पद आहे. गावाच्या विकासासाठी लागेल तेवढा निधी देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. यावेळी हेरले प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकरी डॉ. राहुल देशमुख यांनी गावात ताप उपचार केंद्र सुरू केले असून यामध्ये दोन महिन्यांच्या बाळापासून ८० वर्षांपर्यंतचे नागरिक उपचार घेऊन बरे झाल्याचे सांगितले. यावेळी हातकणंगले पं.स.चे माजी सभापती राजेश पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मुनीर जमादार, माजी उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य राहुल शेटे, डॉ. महावीर पाटील, डॉ. अमोल चौगुले, डॉ. आर.डी. पाटील, डॉ. हर्षवर्धन चौगुले, डॉ. इम्रान देसाई उपस्थित होते.
फोटो : हेरले (ता. हातकणंगले) येथे कोविड सेंटरच्या भेटीप्रसंगी राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना माहिती देत असताना वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल देशमुख, माजी सभापती राजेश पाटील, मुनीर जमादार व इतर.