कोल्हापूर : येत्या काळात स्पर्धा ऑलंपिक असो वा आशियाई त्यात कोल्हापूरचा खेळाडू असलाच पाहिजे यासाठी अधिकाधिक प्रयत्न करू. अशी ग्वाही नूतन विभागीय क्रीडा उपसंचालक संजय सबनीस यांनी दिली. त्यांनी प्रभारी क्रीडा उपसंचालक युवराज नाईक यांच्याकडून शुक्रवारी पदभार स्वीकारला.
सबनीस म्हणाले, कोल्हापूर जिल्हा क्रीडा व खेळाडूंच्या दृष्टीने पोषक आहे. खेलो इंडिया, ऑलंपिक, आशियाई, काॅमनवेल्थ आदी स्पर्धांमध्ये कोल्हापूरचे नेमबाज, जलतरणपटू उतुंग कामगिरी करीत आहेत. त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून इतर खेळातील खेळाडूंनाही चांगला सुविधा येथे निर्माण केल्या जातील. त्यातून चांगले खेळाडू ऑलंपिक, आशियाई आदी स्पर्धांकरिता घडतील. यासाठी
सबनीस यांनी पदभार स्वीकारल्यानंतर विभागीय क्रीडा संकुलाची पाहणी केली. तत्पूर्वी कोल्हापूरसह पाच जिल्ह्यातील जिल्हा क्रीडाधिकाऱ्यांची बैठक घेऊन आढावा घेतला. जिल्ह्यातील तालुका क्रीडा संकुलांचा आढावाही त्यांनी घेतला. कोल्हापूर विभागीय क्रीडा उपसंचालकपदाचा कार्यभार स्वीकारण्यापूर्वी सबनीस हे अमरावती विभागाचे क्रीडा उपसंचालक होते. यावेळी जिल्हा क्रीडाअधिकारी डाॅ. चंद्रशेखर साखरे (कोल्हापूर), माणिक वाघमारे (सांगली), किरण बोरवडकर (रत्नागिरी), सुहास वनमाने (कराड), क्रीडाधिकारी शंकर भास्करे आदी उपस्थित होते.
संकुलाचे स्वप्न सत्यात उतरवू
पाच जिल्ह्याकरिता उभारण्यात आलेल्या विभागीय क्रीडासंकुलातील त्रुटी व उपाययोजनांबाबतची माहिती घेतली जाईल. त्यावर प्रभावी उपाययोजनाही केल्या जातील. लवकरच खेळाडूंकरिता सुसज्ज असे संकुलाचे स्वप्न सत्यात उतरवू, अशी ग्वाही सबनीस यांनी दिली.
फोटो : ०२०७२०२१-कोल- संजय सबनीस (डेप्युटी डायरेक्टर क्रीडा)
ओळी : कोल्हापूर विभागाचे विभागीय क्रीडा उपसंचालक संजय सबनीस यांनी प्रभारी क्रीडा उपसंचालक युवराज नाईक यांच्याकडून शुक्रवारी पदभार स्वीकारला. यावेळी डाॅ. चंद्रशेखर साखरे, माणिक वाघमारे, युवराज नाईक, किरण बोरवडकर, सुहान वनमाने आदी उपस्थित होते.