संकेश्वर : अलीकडील दोन वर्षांत येणाऱ्या महापुराची तीव्रता लक्षात घेऊन पूरग्रस्तांचे सुरक्षित जागेत पुनर्वसन करण्यात येईल, अशी ग्वाही कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी दिली.
पूरग्रस्त भागाच्या नुकसानीच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री येडियुराप्पा हे रविवारी आले होते. यावेळी त्यांनी शहरातील शंकरलिंग मठ, नदीवेस व लक्ष्मी पूल आदी पूरग्रस्त भागाची पाहणी केली. येडियुराप्पा म्हणाले, पालिकेकडे घरकुलासाठी ५० एकर जागा उपलब्ध आहे. त्या पर्यायी जागेचा पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी विचार केला जाईल. मात्र, त्यासाठी पूरग्रस्त नागरिकांनी संमती दिल्यास पुनर्वसनाचा आराखडा तयार करण्यात येईल. पाणी ओसल्यानंतर नुकसानीची पाहणी करण्यात येईल. यावेळी उपमुख्यमंत्री गोविंद कारजोळ, मंत्री उमेश कत्ती, महसूल मंत्री आर. अशोक, परिवहनमंत्री लक्ष्मण सवदी, जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ, नगराध्यक्षा सीमा हतनुरे आदी उपस्थित होते.
फोटो ओळी : संकेश्वर येथे पूरग्रस्त भागाची पाहणी करताना मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा. शेजारी उपमुख्यमंत्री गोविंद कारजोळ, उमेश कत्ती, जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ आदी उपस्थित होते.
क्रमांक : २५०७२०२१-गड-०६