कोल्हापूर - ज्या कोल्हापूर जिल्ह्यानं पदवीधरच्या निवडणुकीत दोन वेळा आमदार केलं, नंतर ते मंत्री झाले, कोल्हापूरचे ते भूमीपूत्र आहेत. त्यांनी कोरोनामुळं कोल्हापूर जिल्ह्यातील माणसं जगली का मेली ते तरी बघायला यावं असा टोला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंदकांत पाटील यांना लगावला.राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्ट आणि डॉक्टर असोसिएशन यांच्यावतीने अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना फेस शील्डचे शासकीय विश्रामगृहावर वितरण करण्यात आले. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना हे आव्हान दिले.मुश्रीफ म्हणाले, चंदकांत पाटील यांची मी मुलाखत पाहिली आहे. यामध्ये दोन तीन वेळा कोल्हापूरचा उल्लेख आला आहे. गेल्या ५० दिवसात कोल्हापूरची माणसं काय करत आहेत, ती जगली का मेली हे सुध्दा बघायला पाटील आलेले नाहीत. आम्ही सत्तेवर असतो तर यापेक्षा अधिक चांगलं काम केलं असतं असं म्हणणाऱ्या पाटील यांनी पहिल्यांदा कोल्हापुरात यावं. सर्व पातळ्यांवर कोल्हापूर जिल्ह्यात कसं चागलं काम सुरू आहे ते पहावं.महापुरावेळी आम्ही चांगल काम केलं असं पाटील सांगत आहेत याची खिल्ली उडवताना मुश्रीफ म्हणाले, जेव्हा चिखलीत पाणी शिरत होतं तेव्हा मुख्यमंत्री आणि यांची महाजनादेश यात्रा सुरू होती. माणसं बुडायला लागलीत तेव्हा यात्रा सोडून कोल्हापूरला येण्याचे आवाहन मी केले होते. त्यानंतर ते किती दिवसांनी आले, त्यांची टर कशी उडवली गेली, त्यांना काढता पाय कसा घ्यावा लागला हे सगळं जनतेला माहिती आहे.
या महापुरातील मेलेल्या जनावरांचा शाप त्यांना लागला. महापुरानंतर शेतकऱ्यांना कर्जमाफी, त्यांना अनुदान या सगळ्या गोष्टी आम्ही सत्तेवर आल्यानंतर केल्या.त्यांनी आता लक्ष्मीदर्शन करावंचंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या मंत्रीपदाच्या काळात कोल्हापुरात अनेकांना लक्ष्मीदर्शन घडवले. आता या कोरोनाच्या संकटावेळी त्यांनी कोल्हापुरात यावं आणि इथल्या गोरगरीबांना पुन्हा एकदा लक्ष्मीदर्शन घडवावं असाही टोला मुश्रीफ यांनी पाटील यांना लगावला.