- विश्र्वास पाटीलमी त्या वेळेला न्यू कॉलेजमध्ये एस. वाय. बी. कॉम.मध्ये होतो. मंगळवार पेठेत भाड्याने खोली घेऊन राहत होतो; परंतु आम्ही गावात त्यावेळी शेका पक्षाचे कट्टर कार्यकर्ते होतो. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून १९८९ च्या निवडणुकीत शेका पक्षातर्फे गोविंदराव कलिकते यांनी काँग्रेसचे खासदार उदयसिंहराव गायकवाड यांना कडवे आव्हान दिले होते.
गायकवाड यांच्याबद्दल त्या निवडणुकीत मतदारांत प्रचंड नाराजी होती. त्यामुळे पूर्ण मतदारसंघात कलिकते यांची हवा तयार झाली होती. त्यांचे खटारा (गाडी) हे चिन्ह होते. प्लास्टिकची लाल गाडी खिशाला लावून तरुण कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर प्रचारात उतरले होते.कलिकते यांची प्रचारात हवा करण्याची हातोटी होती. त्यावेळी आचारसंहितेचा बडगा नव्हता. त्यामुळे खर्चावर बंधन नव्हते. कलिकते १९८५ ला जिल्ह्यातील मातब्बर नेते श्रीपतराव बोंद्रे यांचा पराभव करून सांगरूळ विधानसभा मतदार संघातून विजयी झाल्याने ते ‘जायंट किलर’ ठरले होते. त्यामुळेही त्यांच्या नेतृत्वाबद्दल मतदारसंघात क्रेझ होती. त्यावेळी भोगावती कारखान्याची सत्ताही त्यांच्याकडेच होती.
सगळ्यांत महत्त्वाचे म्हणजे शेका पक्षाच्या हाडाच्या कार्यकर्त्यांची फौज त्यांच्या पाठीशी होती. त्या बळावर त्यांनी या मैदानात शड्डू ठोकला होता. बिंदू चौकात एक भला मोठा फलक लावला होता. त्यावर गायकवाड यांचा उल्लेख ‘मौनी बाबा’ असा केला होता. कोल्हापूर शहरातूनच कलिकते यांना जास्त प्रतिसाद होता. कलिकते यांनी काढलेल्या प्रचारफेरीस प्रचंड प्रतिसाद होता. त्या फेरीत ‘गोंधळ’ हा सजीव देखावा होता. त्यातील गोंधळी ‘ठरलं बघा... नक्की बघा...!’ एवढंच म्हणायचा. लोक त्याला हात उंचावून प्रतिसाद द्यायचे. आता या निवडणुकीत आमदार सतेज पाटील यांनी ‘आमचं ठरलंय..’ ही कॅचलाईन फेमस केली, त्यावेळी ‘ठरलं बघा...’ ही कॅचलाईन लोकांच्या तोंडात होती.
प्रचाराची सांगता करतेवेळी त्यांनी काढलेली मिरवणूक विरोधी उमेदवारास धडकी भरविणारी होती. त्यावेळी ट्रॅक्टर-ट्रॉलीतून प्रचार केला जाई. त्यांनी काढलेली ट्रॅक्टर रॅली एवढी मोठी होती की तिची सुरुवात बिंदू चौकात आणि शेवट पुईखडीला होता. या प्रचारात आलेल्या कार्यकर्त्यांना त्यावेळी भोगावती कारखान्याच्या संचालकांच्या घरांतून भाकरी व झुणका दिला जाई. कुरुकलीचे बळी यशवंत पाटील यांच्याकडे ही जबाबदारी असे. वातावरण एकदम चांगले होते. त्यामुळे सीट नक्की बसणार याचा आत्मविश्वास होता. त्यामुळे मी कलिकते यांचा मतमोजणी प्रतिनिधी होतो. साहेब निवडून आले तर गुलालाने कपडे रंगणार म्हणून आम्ही त्यावेळी जुनी कपडे घालून गेलो होतो. वातावरण चांगले होते; परंतु कागलला राजीव गांधी यांची सभा झाली व गडहिंग्लज मतदारसंघात समाजवाद्यांनी कलिकते यांना मदत केली नाही. त्यामुळे दोन्ही मतदारसंघात प्रत्येकी वीस हजारांचे लीड गायकवाड यांना मिळाले व त्याच मतांवर ते विजयी झाले. त्यांनाही आपण निवडून येणार याचा आत्मविश्वास नव्हता. पहाटे चार वाजता गुलाल अंगावर घेऊनच ते मतमोजणी केंद्रात आले.