इचलकरंजी : नगरपालिकेतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची ग्रॅच्युईटी रक्कम दोन वर्षांपासून प्रलंबित आहे. तसेच कर्मचाऱ्यांना रजेची व सुट्टीच्या कामाचा मोबदलाही एक वर्षापासून मिळालेला नाही. ही रक्कम त्वरित मिळावी, या मागणीचे निवेदन माजी उपनगराध्यक्ष रवी रजपुते यांनी उपनगराध्यक्ष तानाजी पोवार यांना दिले. पाेवार यांनी १२ जुलैला याविषयी बैठक घेऊन निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.
इचलकरंजी नगरपालिकेतून सेवानिवृत्त झालेल्या १२५ कर्मचाऱ्यांची ग्रॅच्युईटी दोन वर्षांपासून, तर २००पेक्षा अधिक सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या हक्काच्या रजेची रक्कम व सफाई कामगारांच्या सुट्टीच्या पगाराचा मोबदला एक वर्षापासून मिळालेला नाही. या संदर्भात ऑक्टोबर २०२०मध्ये सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. मात्र, या विषयांवर कोणताही ठोस निर्णय झाला नाही. इचलकरंजी नगर परिषदेनेही या संदर्भात जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी केली. सुमारे १६ ते १७ कोटी रुपये या वेतन राखीव निधी तरतुदीच्या केवळ व्याज रकमेतून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची थकीत देय रक्कम भागवता येते. त्यामुळे हा प्रश्न तातडीने मार्गी लावून कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून द्यावा; अन्यथा ठोस निर्णय न झाल्यास मुख्याधिकारी यांच्या दालनासमोर उपोषण करण्याचा इशारा रजपुते यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.