दत्तवाड : मराठा समाजाला कोणत्याही परिस्थितीत आरक्षण मिळायलाच पाहिजे, अन्यथा शिरोळ तालुक्यातील मराठी बांधवांना सोबत घेऊन रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा शिरोळ तालुका मराठा समाज फाउंडेशनचे अध्यक्ष नंदकुमार नाईक यांनी दिला. तसेच तालुक्यातील मराठा समाजात ऐक्य निर्माण करून आरक्षणाबाबत सर्व बांधवांना सोबत घेऊन लॉकडाऊननंतर मूक मोर्चा न काढता ठोक मोर्चा काढण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
घोसरवाड (ता. शिरोळ) येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. नाईक म्हणाले, मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत हेळसांड करणाऱ्या केंद्र व राज्य सरकारने आधी इतिहास वाचावा, मगच आमच्या आरक्षणावर बोट उठवावे. ही लढाई आमच्या समाजातील सर्वसामान्य मुला-मुलींच्या भविष्यासाठी आहे. इतर समाजाबरोबर मराठा समाजालाही आरक्षण देण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.
याप्रसंगी सरपंच साहेबराव साबळे, प्रभाकर पाटील, विश्वास कमते, शुभम नाईक, संतोष पाटील, संकेत नाईक, ऋषिकेश कोकणे, संजय चव्हाण यांच्यासह फाउंडेशनचे कार्यकर्ते उपस्थित होते.