कोल्हापूर : ‘आठवणींचे आपण एक गाठोडे बांधून पाहू, शिदोरी म्हणून हवं तर सोबत आपल्या वाहू, आई ऐकतेस ना मला येऊ दे ना जगात, बघ मी ठेवेन तुला सुखात.’ या स्त्री भावविश्वाचे अंतरंग खुलवत झालेल्या कविसंमेलनाने रसिकांना मंत्रमुग्ध केले.
मराठी राजभाषा दिनानिमित्त महावीर विद्यालयात महावीर विद्यालयाचा मराठी विभाग आणि मराठी कवी लेखक संघटना करवीर यांच्या विद्यमाने कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले. प्रमुख पाहुण्या म्हणून सुजाता पेंडसे उपस्थित होत्या. अध्यक्षस्थानी श्रीराम पचिंद्रे होते. यावेळी स्त्रीभ्रूणाचे मनोगत मांडणाऱ्या अरुणा भोसले यांच्या भावस्पर्शी कवितेने रसिकांच्या काळजाला हात घातला. अपर्णा पाटील यांचे ‘आठवणींचे गाठोडे’, गौरी भोगले यांचे ‘तिचं बाईपण पोळी लाटत गेली... पोळ्या गोल होत गेल्या, त्या भाजताना, सृजन लिहिणारी बोटं करपून गेली’ या कवितांनी स्त्री मनाला साद घातली. सुजाता पेंडसे यांनी कविता फक्त रंगमंचावर टाळ्या घेणारी असू नये, तर कवितेला आशय आणि खोलीही असायला हवी, असे मनोगत व्यक्त केले.
यानंतर कल्याणी आडत, वैष्णवी अंदुरकर, प्रियदर्शिनी चोरगे यांच्या कवितेने कार्यक्रमाची रंगत वाढवली. यावेळी प्रताप पाटील, अरुण सुनगार, सारिका पाटील यांनी गजल सादर केली. महाविद्यालयाचे मराठी विभागप्रमुख डॉ. गोपाळ गावडे यांनीही आपली कविता सादर केली. यावेळी माजी प्राचार्य प्रदीप गबाले, मधुकर मुसळे, करवीरनगर वाचन मंदिराच्या संचालक संजीवनी तोफखाने उपस्थित होत्या. सारिका पाटील यांनी सूत्रसंचालन केले. अपर्णा पाटील यांनी आभार मानले.
--
फोटो नं ०४०३२०२१-कोल-कविसंमेलन
ओळ : मराठी राजभाषा दिनानिमित्त महावीर विद्यालयात आयोजित कविसंमेलनात अपर्णा पाटील यांनी कविता सादर केली. यावेळी गौरी भोगले व सुजाता पेंडसे उपस्थित होत्या.
--